Dharavi Redevelopment Project: सर्व झाडे किमान सहा फूट उंचीची आणि स्थानिक प्रजातींची असतील. तसेच या वृक्षांची सात वर्षे नियमित देखभाल करण्याची जबाबदारीही कंपनीने स्वीकारली आहे.
धारावी पुनर्विकास प्रकल्पात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या माध्यमातून धारावीतील पात्र झोपडपट्टीधारकांना मोफत घरे दिली जाणार आहेत. सुमारे साडेतीन लाख अपात्र झोपडपट्टीधारकांना भाडेतत्त्वावरील घरे दिली जातील. येथील झोपडीधारकांचे अन्यत्र पुनर्वसन करण्यासाठी मुंबईतील काही जागांची चाचपणीही करण्यात आली. मात्र, त्यास विरोध झाला. या प्रकल्पाला गती दिली जात आहे. ती देताना धारावी पुनर्वसन प्रकल्पात झाडेही बाधित होत आहेत.
धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात १ हजार ६९३ झाडे बाधित होणार असून, त्यामध्ये ८७१ झाडे तोडण्यात येणार आहेत, तर ८२२ झाडांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे. या बदल्यात पालघर जिल्ह्यातील चहाडे गावातील ९० एकर जागेवर २२,९०४ स्थानिक प्रजातींची झाडे लावण्याचे हमीपत्र कंपनीने महापालिकेला दिले आहे.
Ramesh Mhatre Case: डॉक्टर मारहाणीचा तपास उपायुक्तांकडे द्या! नगरसेवक रमेश म्हात्रेप्रकरणी उच्च न्यायालयाचे आदेश
महापालिकेच्या उद्यान विभागाकडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावानुसार, धारावीतील शहर सर्वेक्षण क्रमांक २ (भाग) आणि ३ (भाग), सब प्लॉट-बी येथे पुनर्वसन इमारतींच्या बांधकामासाठी होणाऱ्या उत्खननामुळे आठ हजार झाडे बाधित होणार आहेत. मे २०२६ मध्ये झालेल्या संयुक्त पाहणीत संबंधित जागेवर १ हजार ९९८ जिवंत झाडे आणि ७ उन्मळून पडलेली झाडे, अशी एकूण २ हजार ००५ झाडे असल्याची नोंद करण्यात आली.
मंजूर आराखड्यानुसार त्यापैकी १ हजार ६९३ झाडे प्रकल्पाच्या कामात अडथळा ठरत असल्याने त्यांना हटविण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. कंपनीने दिलेल्या हमीपत्रानुसार, झाडे तोडल्यानंतर १५ दिवसांच्या आत २२ हजार ९०४ नवीन झाडांची लागवड केली जाईल.
आणखी एक प्रस्ताव
मुंबई महापालिकेच्या विविध प्रकल्पांसह खासगी पुनर्विकास आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी तब्बल १ हजार ४४३ झाडे बाधित होणार असून, त्यापैकी ९०२ झाडे थेट कापली जाणार आहेत. तर ५४१ झाडांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे. या वृक्षतोडीच्या बदल्यात २१,६२५ झाडे लावली जाणार असल्याचा दावा महापालिकेकडून करण्यात आला आहे. हा प्रस्तावही मंगळवारी वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत सादर करण्यात येणार आहे.
पेपरफुटी प्रकरणात तुकाराम मुंढेंकडे तक्रार, भेटीनंतर रोहित पवार यांची पहिली प्रतिक्रिया
प्रकल्पासाठी ‘बेस्ट’ आगाराचीही जागा
धारावी पुनर्विकास प्रकल्पात ‘बेस्ट’ उपक्रमाच्या धारावी आगार आणि काळा किल्ला आगाराच्या जागेचाही वापर होणार आहे. या बस आगाराची जमीन धारावी पुनर्विकास प्रकल्प आणि नवभारत मेघा डेव्हलपर्स प्रा.लि यांना हस्तांतरित करण्याच्या प्रस्तावाला मुंबई महापालिका सभागृहातही मंजुरी दिल्यानंतर या कामाला आता गती दिली जात आहे. यामध्ये एकूण २.३५ एकर जागा ‘बेस्ट’ उपक्रमाची तर, उर्वरित जागा जिल्हाधिकारी अंतर्गत आहे.
