• Sun. Sep 13th, 2026

मंत्रालयात श्रीचक्रधर स्वामी यांचा ‘अवतार दिन’ साजरा; श्रीचक्रधर स्वामींच्या विचारांतून समाजाने मानवकल्याणाची शिकवण घ्यावी – मंत्री मंगल प्रभात लोढा – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Sep 13, 2026

मुंबई, दि. १३ : महानुभाव पंथाचे प्रवर्तक भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी यांच्या अवतार दिनानिमित्त मंत्रालयात आयोजित कार्यक्रमात कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी श्रीचक्रधर स्वामी यांच्या जीवनकार्याचा गौरव केला. श्रीचक्रधर स्वामी यांच्या जीवनकार्यातून मिळालेले विचार अंगीकारण्याचे आवाहन मंत्री लोढा यांनी यावेळी केले.

श्रीचक्रधर स्वामी यांनी तत्कालीन समाजात पसरलेल्या अंधश्रद्धा, विषमता, कर्मकांड आणि जातीभेदाला विरोध करून मानवतेवर आधारित विचारांचा प्रसार केला. श्रीचक्रधर स्वामी यांनी स्त्री-पुरुष समानता, सर्वांना शिक्षणाचा अधिकार, अहिंसा, दया, सत्य, परोपकार आणि सामाजिक समरसतेचा संदेश दिला. त्यांच्या शिकवणीतून मानवाने सदाचार, विवेक आणि मानवकल्याणाचा मार्ग स्वीकारावा, असा संदेश मिळतो, असे मंत्री लोढा यांनी सांगितले.

‘लीळाचरित्र’ हा मराठी भाषेतील आद्य चरित्रग्रंथ त्यांच्या कार्याचा महत्त्वपूर्ण वारसा मानला जातो. श्रीचक्रधर स्वामींच्या अवतार दिनाचे औचित्य साधून समाजात बंधुभाव, नैतिक मूल्ये आणि सामाजिक एकता अधिक बळकट करण्याचे आवाहन यावेळी मंत्री लोढा यांनी केले.या कार्यक्रमास सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव रामदास कोळेकर, प्रदीप कोपार्डे, दत्तात्रय शिंदे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed