मुंबई: नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी संसदेवर मोर्चा काढणाऱ्या विद्यार्थ्यांवर काल दिल्ली पोलिसांनी आक्रमकपणे लाठीचार्ज केला. शांततेत आंदोलन करणाऱ्या काही विद्यार्थ्यांनाही पोलिसांनी लाठ्याकाठ्यांना झोडपून काढल्याने पोलीस प्रशासन आणि केंद्र सरकारवर संताप व्यक्त केला जात आहे. अशातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र पोलिसांचं समर्थन करत पोलिसांनी मोठा संयम दाखवला असून अशा प्रकारचं आंदोलन योग्य पद्धतीने होण्यासाठी जेवढी कारवाई करणं गरजेचं असतं ती कारवाई पोलिसांनी केली आहे, असं म्हणत पोलिसांची बाजू घेतली आहे. तसंच कोणत्याही सरकारला आपल्या जनतेवर लाठीचार्ज करणं, हे कधीच आवडत नाही. पण काल आपण बघितलं असेल तर काल पोलिसांनी कंट्रोल घेतला नसता तर अनेक अनावश्यक गोष्टी तिथं घडल्या असत्या, असा आरोपही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला आहे.
नवी दिल्ली येथील विद्यार्थी आंदोलनावर भूमिका मांडताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा प्रत्येकाला हक्क आहे. फक्त संविधानाने दिलेले हक्क आणि त्यासोबतच संविधानाने सोपवलेली जबाबदारी या दोन्ही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. कोणीही परवानगी घेऊन आंदोलन करत असेल, शांतीपूर्वक आंदोलन करत असेल तर अशा आंदोलनांना पोलिसांकडून परवानगीही दिली जाईल आणि अशी आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. मात्र जाणीवपूर्वक राजकीय अस्थिरता निर्माण करण्याकरता विनापरवानगी आंदोलन करणे, हिंसा करणे हो योग्य नाही. अशा लोकांवर आवश्यक ती कारवाई केली जाईल,” असं ते म्हणाले.
“आपण कोणतंही आंदोलन बघितलं तर ज्यावेळी आंदोलनाला चेहरा नसतो, तेव्हा काही वेगळ्या प्रवृत्ती त्या आंदोलनात घुसत असतात. अशा प्रवृत्ती आंदोलनांचा फायदा घेऊन, आंदोलनाच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपले स्वार्थ कसे पूर्ण करता येतील, याचा प्रयत्न करत असतात. दिल्लीमध्ये काल आंदोलन झालं, त्यामध्येही अनेक राजकीय पक्ष आपली पोळी कशी भाजता येईल, यासाठी प्रयत्न करत आहेत,” असा हल्लाबोलही मुख्यमंत्र्यांनी केला आहे.
आंदोलकांसह राजकीय पक्षांवर गंभीर आरोप
देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीतील आंदोलनावर बोलताना आंदोलक विद्यार्थी आणि आंदोलनात सहभागी असलेल्या राजकीय पक्षांवर हल्लाबोल केला आहे. “अनेक अशा संघटना ज्या संघटनांचा या विषयाशी कसलाही संबंध नाही, त्या संघटनाही अराजकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. दिल्लीत जे आंदोलन झालं ते नेतृत्वहीन होतं, त्यामुळे पोलिसांच्या गाड्या फोडणं, दगडफेक करणं, अशा घटना घडल्या. मी सर्व आंदोलकांवर आरोप करत नाही, यात प्रामाणिकपणे आंदोलन करणारे विद्यार्थीही असतील, मात्र या आंदोलनाच्या खोलात आपण गेल्यानंतर आपल्या लक्षात येईल की, यामध्ये ज्यांचा नीट परीक्षेशी काही संबंध नाही, असेही लोक घुसले होते. त्यांना अराजकता निर्माण करायची होती,” असा आरोप फडणवीस यांनी केला आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा