• Mon. Jul 20th, 2026

    आषाढी वारी २०२६…. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पंढरपुरात सुविधांची पाहणी – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jul 19, 2026
    आषाढी वारी २०२६…. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पंढरपुरात सुविधांची पाहणी – महासंवाद

    पंढरपूर, दि. १९: आषाढी वारी २०२६ च्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पंढरपूर येथे वारकऱ्यांसाठी प्रशासनाने उपलब्ध केलेल्या सोयी-सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी भाविकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

    दर्शन रांगेत पाणी वाटप:
    उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रा शेड येथील रिद्धी-सिद्धी दर्शन मंडपातील रांगेतील भाविकांना स्वतःच्या हस्ते पाणी बॉटलचे वाटप केले. प्रशासनाने उभारलेल्या सुविधांबाबत त्यांनी भाविकांकडून माहिती घेतली.

    चंद्रभागा व वाळवंटाची पाहणी:
    त्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी वाळवंटातील स्वच्छतेची पाहणी केली. आरोग्य विभागाच्या वतीने उभारण्यात आलेल्या वैद्यकीय कक्षाचे त्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यानंतर होडीमध्ये बसून त्यांनी चंद्रभागा नदीपात्रातील स्वच्छतेची पाहणी केली. यावेळी होडीच्या सुरक्षेचा आढावा घेऊन लाईफ जॅकेटबाबतची माहिती घेतली. वारकऱ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच यावेळी स्वच्छता कर्मचाऱ्यांशी संवाद साधून स्वच्छतेच्या कामासाठी सुरक्षित साधनांचा वापर करून आरोग्याची काळजी घ्यावी अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

    आपत्कालीन कक्ष व वृक्षारोपण:
    भक्तीसागर येथे वारकऱ्यांसाठी उभारण्यात आलेल्या आपत्कालीन कक्षाची त्यांनी पाहणी केली. आयसीयू मध्ये दाखल असलेल्या रुग्णांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची काळजीपूर्वक विचारपूस केली व डॉक्टरांना आवश्यक सूचना दिल्या. यानंतर भक्तीसागर परिसरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

    वारकऱ्यांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी शासन व प्रशासन २४ तास दक्ष आहे. आषाढी वारी निर्विघ्न पार पडावी यासाठी सर्व यंत्रणा सज्ज आहेत, असे उपमुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.

    याप्रसंगी सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, महसूल राज्यमंत्री योगेश कदम, आमदार समाधान आवताडे, आमदार अभिजीत पाटील, आमदार राजू खरे, पंढरपूर नगराध्यक्ष प्रणिता भालके, अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्यासह संबंधित अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed