• Thu. Sep 3rd, 2026

धर्मपुरीत संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून भक्तिमय वातावरणात व मोठ्या उत्साहाने स्वागत – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Jul 19, 2026
धर्मपुरीत संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून भक्तिमय वातावरणात व मोठ्या उत्साहाने स्वागत – महासंवाद

सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी रथावर पुष्पवृष्टी

पंढरपूर, दि. १९: आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलेल्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे आज धर्मपुरी येथे भक्तिमय व टाळ-मृदंगाच्या गजरात आगमन झाले. यावेळी ग्रामविकास विभाग व जिल्हा प्रशासनाच्या वतीने पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेऊन पुष्पहार अर्पण करत मोठ्या उत्साहाने स्वागत केले. यावेळी सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने पालखी रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली. टाळ-मृदंगाच्या गजरात पालकमंत्री पालखीसोबत चालले.

धर्मपुरी पालखीतळावर वारकरी,भाविक व ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. राम कृष्ण हरी…‘ज्ञानोबा माऊली, तुकाराम’ च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. पोलीस बँड पथकाने बँड मधून भक्तीमय धून वाजवून पालखीचे स्वागत उत्साहाने केले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त ह.भ.प. श्री भावार्थ देखणे महाराज यांचे स्वागत करण्यात आले.

याप्रसंगी आमदार उत्तम जानकर, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील, सोलापूर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, सातारा पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, सातारा मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, उपविभागीय अधिकारी विजया पांगारकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड, तहसीलदार सुरेश शेजुळ यांच्यासह दोन्ही जिल्ह्यातील संबंधित अधिकारी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालखीच्या स्वागतासाठी धर्मपुरी पालखीतळावर जिल्हा प्रशासनाने चोख व्यवस्था केली आहे. पिण्याचे पाणी, स्वच्छता, वैद्यकीय पथक, वीज, वाहतूक व कायदा-सुव्यवस्था याबाबत विशेष नियोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी आरोग्य विभागाच्या वतीने वारकरी भाविकांची प्राथमिक आरोग्य तपासणी केली जात आहे. जिल्हा परिषदेच्या वतीने हिरकणी कक्ष सज्ज ठेवण्यात आलेला आहे. त्याबरोबरच भाविकांच्या पायांना आराम मिळावा म्हणून फूट मसाज मशीनची व्यवस्था करण्यात आली असून हजारो भाविक या सुविधेचा लाभ घेत आहे. त्याप्रमाणेच वारकऱ्यांच्या आरोग्य सेवेसाठी आरोग्य दूत, आरोग्य बाईक तैनात करण्यात आले आहे.

 

००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed