• Sun. Jul 19th, 2026

    बलुेट ट्रेनसाठी खाडीखालून बोगद्याचं काम सुरू, भारतात पहिला पाण्यातील रेल्वेमार्ग; दुसऱ्या ‘टीबीएम’ने खोदकाम

    बलुेट ट्रेनसाठी खाडीखालून बोगद्याचं काम सुरू, भारतात पहिला पाण्यातील रेल्वेमार्ग; दुसऱ्या ‘टीबीएम’ने खोदकाम

    First Undersea Rail Tunnel: भारतातील पहिल्या बुलेट ट्रेनसाठी दुसऱ्या टनेल बोरिंग मशीनने खोदकाम सुरू झालं आहे. ठाण्याच्या खाडीखालून ७ किमी लांब रेल्वे मार्ग बांधण्यात येणार आहे.

    ठाणे: भारतातील पहिला खाडी खालील रेल्वे बोगदा लवकरच साकार होणार आहे. ठाण्याच्या खाडीमध्ये भल्या मोठ्या टनेल बोरिंग मशीनने खोदकाम सुरू झालं आहे. यामुळे मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामाला वेग मिळाला आहे. बुलेट ट्रेनसाठी दुसरं टीबीएम दाखल झालं असून खाडीखाली ७ किमी लांब बोगद्याचं खोदकाम सुरू करण्यात आलं आहे. भारतात पहिल्यांदाच पाण्याखालील बोगद्यात रेल्वे मार्ग तयार करण्यात येणार आहे. दुसऱ्या टीबीएमचा वापर करून घणसोलीतील सावली येथून विक्रोळीपर्यंत बोगदा तयार करण्यात येणार आहे. हा बोगदा १० किमी लांब असून यापैकी ७ किमी लांब मार्ग ठाण्याच्या खाडीखालून जातो.

    किती बोगद्यांचं काम सुरू?

    मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात एका २१ किमी लांब भुयारी बोगद्याचा समावेश आहे. यापैकी १६ किमी लांब मार्ग सावली ते वांद्रे कुर्ला संकुलापर्यंत असेल. टनेल बोरिंग मशीनचा वापर करून याही बोगद्याचं खोदकाम सुरू होणार आहे. पहिल्या टीबीएमने खोदकाम ५ जुलै रोजीच सुरू झालं आहे. विक्रोळी ते बीकेसीपर्यंत ६ किमी लांब मार्गाचं काम सुरू आहे. उरलेल्या ५ किमी लांब मार्गाचं काम यापूर्वीच पूर्ण झालं आहे. यासाठी ‘न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग’चा वापर करण्यात आला आहे.

    Maharashtra TimesCentral Railway: मध्य रेल्वेवर १५ डब्यांच्या लोकल वाढणार, CSMT-कल्याण, कर्जत मार्गावर दहा फेऱ्या; वेळापत्रक कसं असेल?

    सध्या खोदकामसाठी वापरण्यात येणारं टनेल बोरिंग मशीन रेल्वे मार्गासाठी वापरण्यात येणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या टीबीएमपैकी एक आहे. या मशीनचं कटरहेड १३.६ मीटर असून हे मशीन एका चार मजली इमारती इतकं उंच आहे. ५०० हत्तींच्या वजनाचं हे मशीन असून लांबी एखाद्या फूटबॉल पिचप्रमाणे ९६ मीटर आहे. या प्रकल्पात जमिनीवरील हालचालींचा मागोवा घेण्यासाठी आणि जवळपासच्या बांधकामांचे संरक्षण करण्यासाठी रिअल-टाइम मॉनिटरिंग सिस्टम देखील समाविष्ट आहे.

    मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा मार्ग कसा आहे?

    घणसोलीतील सावलीमध्ये हे मशीन खाली उतरवण्यात आलं आहे. त्यानंतर शाफ्टमध्ये मशीनचे वेगवेगळे भाग जोडण्यात आले. यामशीनद्वारे मुंबईतील वाहतूक आणि रहिवासी असलेल्या मार्गांच्या खालून रेल्वे मार्ग तयार करणं शक्य झालं आहे. महाराष्ट्रात ठाणे, मुंबई, विरार, आणि बोईसर या चार ठिकाणी बुलेट ट्रेनची स्थानकं असतील. मुंबई ते अहमदाबाद अंतर केवळ २ तास ७ मिनिटांत पार होणार आहे.

    Maharashtra TimesKandivali Railway Terminus: मुंबईतील सर्वात मोठं रेल्वे टर्मिनस उभारण्याची तयारी, कांदिवलीमध्ये जमीन निश्चित; प्रकल्पासमोर एक अडथळा

    संपूर्ण बुलेट ट्रेनचा मार्ग ५०८ किमी लांब असेल. या मार्गावर ८ डोंगरी बोगदे आहेत आणि या सर्वांचं खोदकाम NATM तंत्रज्ञानावर आधारित आहे. यापैकी सात बोगदे तर महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातचं आहेत आणि शेवटचा बोगदा गुजरातमधील वलसाड जिल्ह्यात आहे. याशिवाय संपूर्ण कॉरिडोरवर २८ स्टीलचे पूल आणि २५ नदीपूल आहेत. यापैकी २१ नदीपूल गुजरात तर उरलेले चार पूल महाराष्ट्रात उपस्थित आहेत.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा