• Sat. Jul 4th, 2026
    गरीबनगरची झोपडपट्टी हटवली, आता वांद्रे पूर्वेला 300 स्क्वेअर मीटरचा आधुनिक डेक, 700 प्रवाशांची क्षमता, गर्दीवर भन्नाट तोडगा

    Bandra East New Elevated Passenger Deck : वांद्रे पूर्वेला स्थानकालगतच्या गरीब नगरमधील अनधिकृत झोपड्यांवर कारवाई केल्यानंतर सुमारे ५,२०० चौरस मीटर जागा उपलब्ध झाल्याने दोन्ही पादचारी पुलांना जोडणारा डेक उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : वांद्रे रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील पादचारी पूल आणि फलाटांवरील गर्दी कमी करण्यासाठी पश्चिम रेल्वेने महत्त्वाचे नियोजन हाती घेतले आहे. स्थानकाच्या पूर्वेला सुमारे ३०० चौरस मीटरचा डेक उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, त्याला पूर्वेकडील दोन्ही पादचारी पुलांची जोडणी दिली जाणार आहे. सुमारे ७०० प्रवाशांची क्षमता असलेल्या या डेकवर लोकल इंडिकेटर, एटीव्हीएमसह अन्य प्रवासी सुविधांची सज्जता होणार असल्याने पुलांवर थांबणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी होण्यास मदत होणार आहे.

    पादचारी पुलांना जोडणाऱ्या डेकचा आराखडा

    वांद्रे पूर्वेला स्थानकालगतच्या गरीब नगरमधील अनधिकृत झोपड्यांवर कारवाई केल्यानंतर सुमारे ५,२०० चौरस मीटर जागा उपलब्ध झाली आहे. याच मोकळ्या जागेत दादर आणि विरार दिशांकडील दोन्ही पादचारी पुलांना जोडणारा डेक उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. प्रवाशांना रेल्वेची वाट पाहण्यासाठी पुलांवर किंवा फलाटांवर गर्दी करण्याऐवजी डेकवरच थांबता येणार असल्याने स्थानकातील प्रवासी व्यवस्थापन अधिक सुलभ होईल. ‘वांद्रे पूर्वेच्या पादचारी पुलांना जोडणाऱ्या डेकचा आराखडा तयार करण्यात येत आहे,’ अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
    Maharashtra TimesKerala Nurse : ट्राफिकमध्ये अडकलेल्या कार चालकाला हार्ट अटॅक, दोन नर्सची एसटीतून उडी, गाडीतच CPR देऊन प्राण वाचवले

    दररोज सुमारे पाच लाख प्रवाशांची वर्दळ

    वांद्रे स्थानकातून पश्चिम आणि हार्बर मार्गावरील उपनगरी रेल्वेची वाहतूक होते. तसेच, वांद्रे-कुर्ला संकुलाशी (बीकेसी) जोडणी असल्याने शहर व उपनगरांतील लाखो प्रवासी येथे उतरून बस किंवा रिक्षाने बीकेसीकडे जातात. त्यामुळे या स्थानकावर दररोज सुमारे पाच लाख प्रवाशांची वर्दळ असते. मोकळ्या झालेल्या जागेत भविष्यात मल्टिमॉडल ट्रान्सपोर्ट हब उभारण्याचाही रेल्वेचा मानस आहे. याशिवाय, वांद्रे टर्मिनसच्या विस्तार आराखड्यातही या डेकचा समावेश करण्यात आला आहे. विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात टर्मिनस परिसरातील डिझेल शेड स्थलांतरित करून त्या जागेवर मेल-एक्स्प्रेस गाड्या उभ्या करण्यासाठी नवीन मार्गिका उभारण्यात येणार आहेत.

    Maharashtra Farmer Gaun Khanij Royalty Free विहीर, गोठा, शेतघरांसाठी गौण खनिज मोफत

    प्रवासी सुविधांचे आधुनिकीकरण

    मुंबई सेंट्रल, दादर आणि वांद्रे टर्मिनसमधून नवीन लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू करण्यासाठी आवश्यक क्षमता उरलेली नसल्याने विद्यमान टर्मिनसचा विस्तार आणि नवीन टर्मिनस उभारण्याच्या सूचना रेल्वे मंडळाने पश्चिम रेल्वेला दिल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर वांद्रे टर्मिनसचा विस्तार आणि स्थानक परिसरातील प्रवासी सुविधांचे आधुनिकीकरण महत्त्वाचे मानले जात आहे.
    Maharashtra TimesVenezuela Earthquake : मी जिवंत आहे, माझ्या बायकोला सांगू नका; बोगदा खणून 8 दिवसांनी वाचवलं, त्याचेच शब्द ऐकून बचाव पथक बुचकळ्यात, कारण समजताच गलबलले

    वांद्रे स्कायवॉक खुला

    जवळपास पाच- सहा महिन्यांपूर्वीच वांद्रे पूर्व रेल्वे स्थानक ते म्हाडा कार्यालयापर्यंत स्कायवॉक उभारणीचे काम पूर्ण करण्यात आले होते. १२३ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेला हा स्कायवॉक २६ जानेवारीच्या निमित्ताने खुला करण्यात आला होता. वांद्रे रेल्वे स्थानक ते म्हाडा कार्यालयादरम्यान मुंबई महापालिकेच्या माध्यमातून स्कायवॉकची पुनर्बांधणी करण्यात आली आहे. मुंबईतील पहिला स्कायवॉक अशी ओळख असलेला हा स्कायवॉक एमएमआरडीएने सन २००८-२००९ मध्ये या मार्गावरील गर्दी टाळण्यासाठी उभारला होता, परंतु तो असुरक्षित झाल्याने २०१९ मध्ये जमीनदोस्त करण्यात आला होता.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा