यवतमाळ, दि. ३० (जिमाका): राज्य शासनाने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना 2026′ जाहीर केली आहे. या कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणी मध्ये तांत्रिक अडचणी आणि दिरंगाई होऊ नये यासाठी राज्य शासनाकडून ‘महाआयटी’च्या माध्यमातून संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आणि आधार क्रमांकावर आधारित राबविली जात आहे. आधार प्रमाणिकरण पूर्ण केलेले व ॲग्रिस्टॅक मध्ये नोंदणी केलेलल्या सर्व पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
सर्व बँकांकडून पात्र कर्जखात्यांचा तपशील थेट पोर्टलवर घेतला जात असून, संगणकीय पडताळणीद्वारे अंतिम याद्या तयार केल्या जात आहेत. या याद्या शेतकऱ्यांना सहज पाहता याव्यात यासाठी गाव चावडी, ग्रामपंचायत, बँक शाखा, विकास संस्था आणि आपले सरकार सेवा केंद्र येथे प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे, पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर बँकांमार्फत संदेश पाठवूनही सूचित केले जाणार आहे.
शेतकऱ्यांनी योजनेची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन, पारदर्शक आणि आधार क्रमांकावर आधारित ठेवण्यात आली आहे. पात्र शेतकऱ्यांनी यादीत नाव आल्यानंतर लाभ मिळवण्यासाठी आपल्या आधार नंबर किंवा यादीतील विशिष्ठ नंबरसह ‘आपले सरकार सेवा केंद्रात’ किंवा बँकेत जाऊन आपल्या कर्जखात्याचे बायोमेट्रिक/आधार प्रमाणीकरण करणे गरजेचे आहे. ही माहिती योग्य असल्याची खात्री करून शेतकऱ्यांनी मान्यता दिली की शासनाकडून थेट कर्जमुक्तीची रक्कम शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात जमा होईल आणि एकवेळ समझोता योजनेतील दोन लाख रुपयांवरील कर्ज रक्कम असलेल्या लाभार्थ्यांनी प्रथम त्यांचा हिश्शाची रक्कम बँकेत भरणे आवश्यक आहे, त्यानंतरच त्यांना शासनाच्या देान लाख रुपयांपर्यत कर्जमुक्तीचा लाभ शेकऱ्यांच्या कर्जखात्यात जमा होईल. यासाठी पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ‘आपले सरकार सेवा केंद्रात’ किंवा बँकेत जाऊन आपल्या कर्जखात्याचे आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी केले आहे.
000000
—
