सांगली, दि. १५ (जिमाका): उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी खानापूर तालुक्यातील रेणावी घाटातील दोन बसच्या अपघातातील जखमींची भेट घेऊन आस्थेने विचारपूस केली व जखमींना दिलासा दिला. उपचारात कुठलीही अडचण येणार नाही, असे सांगून त्यांनी जखमींना लवकरात लवकर बरे होण्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल, तहसीलदार योगेश टोंपे, माजी नगराध्यक्ष व विद्यमान जिल्हा नियोजन समिती सदस्य वैभव पाटील यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, खानापूर तालुक्यातील दोन बसेसच्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. एसटी महामंडळाने त्यांच्या कुटुंबाला त्वरित 10 लाख रुपये देण्याचे ठरवले आहे. त्याव्यतिरिक्त, स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे अपघात विमा योजनेतून प्रत्येकी 2 लाख आणि मुख्यमंत्री मदत कक्षामधून प्रत्येकी 4 लाख अशा संयुक्त मदतीसाठी कार्यवाहीच्या अनुषंगाने यंत्रणांना सूचना दिल्या आहेत. जखमींच्या उपचाराचा खर्च एसटी महामंडळ करणार आहे. फॉलोअप उपचारासाठी आमच्या ट्रस्टच्या माध्यमातून मदत केली जाईल, असे ते म्हणाले.

विटा येथील एका खाजगी रुग्णालयात आज रोजी 8 जखमींवर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. इतर 20 जखमींना उपचार करून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
2 जखमींपैकी एकाला कोल्हापूर व एकाला कराडला उपचाराकरिता पाठवण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
०००