• Mon. Jun 29th, 2026

    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना २०२६; कर्जाच्या ओझ्यातून मुक्ततेकडे बुलढाणाच्या शेतकऱ्यांची वाटचाल – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jun 29, 2026
    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना २०२६; कर्जाच्या ओझ्यातून मुक्ततेकडे बुलढाणाच्या शेतकऱ्यांची वाटचाल – महासंवाद

    राज्य शासनाने जाहीर केलेली ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरत असून बुलढाणा जिल्ह्यातील हजारो शेतकरी या योजनेमुळे नव्या आशेने भविष्यातील शेती नियोजनाकडे पाहत आहेत. वाढता उत्पादन खर्च, अनियमित पाऊस, नैसर्गिक आपत्ती आणि बाजारभावातील चढ-उतार यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना या योजनेमुळे मोठा आधार मिळणार आहे.

    कृषिप्रधान जिल्हा म्हणून बुलढाणाची ओळख आहे. जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी कापूस, सोयाबीन, तूर, हरभरा व इतर नगदी पिकांवर अवलंबून आहेत. मात्र मागील काही वर्षांत हवामानातील बदलांमुळे शेती व्यवसाय अधिक जोखमीचा बनला आहे. अनेक शेतकऱ्यांनी पीक कर्जाच्या माध्यमातून शेती टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला; परंतु प्रतिकूल परिस्थितीमुळे कर्जफेड करणे कठीण झाले. अशा वेळी शासनाची कर्जमुक्ती योजना शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरणार आहे.

    या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जातून दिलासा मिळणार आहे. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही प्रोत्साहनपर लाभ देण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे केवळ थकबाकीदारच नव्हे तर प्रामाणिकपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही न्याय मिळणार आहे.

    जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, विविध सेवा सहकारी संस्था, राष्ट्रीयकृत बँका आणि ग्रामीण बँकांमार्फत मोठ्या प्रमाणावर पीक कर्जाचे वितरण करण्यात येते. या योजनेमुळे संबंधित वित्तीय संस्थांच्या थकीत कर्जाचा प्रश्नही काही प्रमाणात मार्गी लागण्यास मदत होणार आहे. परिणामी शेतकऱ्यांची पतक्षमता वाढून त्यांना नव्याने पीक कर्ज उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होईल.

    कर्जमुक्तीचा लाभ मिळाल्यानंतर शेतकरी आधुनिक तंत्रज्ञान, सुधारित बियाणे, सिंचन सुविधा आणि कृषी यांत्रिकीकरणासाठी अधिक गुंतवणूक करू शकतील. याचा सकारात्मक परिणाम कृषी उत्पादनावर होऊन ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे. व्यापारी व्यवहार, कृषी सेवा केंद्रे, बाजार समित्या आणि ग्रामीण उद्योग यांनाही याचा अप्रत्यक्ष लाभ मिळू शकतो.

    जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून शासनाने योजनेची अंमलबजावणी पारदर्शक आणि जलद गतीने करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. पात्र लाभार्थ्यांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने कर्जमुक्तीचा लाभ वितरित केला जाणार आहे.

    योजनेची ठळक वैशिष्ट्ये

    * पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्ती

    * नियमित कर्जफेड करणाऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ

    * पीक कर्जावरील आर्थिक भार कमी होणार

    * नव्याने कर्ज मिळविण्याचा मार्ग मोकळा होणार

    * ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळणार

    * शेतीतील गुंतवणूक आणि उत्पादनवाढीस मदत होणार

    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या लोकाभिमुख आणि जनकल्याणकारी कार्याचा वारसा जपत राबविण्यात येणारी ही योजना शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील कृषी क्षेत्राला नवसंजीवनी देत शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य निर्माण करण्याची क्षमता या योजनेमध्ये आहे.

    जिल्हा माहिती कार्यालय, बुलढाणा

    0000

     

     

     

     

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed