‘डॉल्बी आणि डीजे फेकून द्या’
राज्यात गेल्या काही दिवसांपासून डीजे आणि डॉल्बी बंदीचा मुद्दा गाजत असताना संभाजी भिडे यांनी या वादात उडी घेतली आहे. “डॉल्बी आणि डीजेच्या या प्रचंड गोंधळातून नक्की काय साध्य होते? त्यातून देशाला काय मिळते?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. लोकप्रतिनिधी अशा ‘मूर्ख’ गोष्टींसाठी मोठ्या प्रमाणावर पैसा पुरवतात, असा आरोप करत त्यांनी ही ‘काळी शक्ती’ गाडण्यासाठी डॉल्बीचा त्याग करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.
दहीहंडीतील नृत्यावर ‘देशद्रोही’ म्हणून टीका
दहीहंडी उत्सवात अलीकडच्या काळात महिला नृत्यांगनांना बोलावून त्यांच्या नृत्याचे कार्यक्रम आयोजित करण्याच्या प्रथेवर भिडे गुरुजींनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. “दहीहंडी हा एक पवित्र हिंदू सण आहे. अशा कार्यक्रमात महिलांना नाचवणे हे अत्यंत चुकीचे असून, ज्यांनी डान्सर नाचवल्या, ते सर्व देशद्रोही आहेत,” असा गंभीर आरोप त्यांनी केला. गौतमी पाटील किंवा राधा पाटील यांच्यासारख्या नृत्यांगनांच्या कार्यक्रमांवरून त्यांनी आयोजकांना लक्ष्य केले असून, असले प्रकार करणारे स्वतःला हिंदू म्हणवून घेण्यास पात्र नाहीत, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
सांस्कृतिक रक्षणाचे आवाहन
भिडे गुरुजींच्या मते, सण हे धर्माची आणि राष्ट्राची आग मनात पेटवण्यासाठी असतात, केवळ करमणुकीसाठी नाहीत. “आपला धर्म आणि संस्कृती जपण्याची जबाबदारी आपलीच आहे. अश्लील डान्स आणि कर्कश संगीत हे आपल्या संस्कृतीचे भाग नाहीत,” असे सांगत त्यांनी तरुणांना यापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. या मुद्द्यावरून त्यांनी केवळ आयोजकांनाच नव्हे, तर अशा कार्यक्रमांना राजाश्रय देणाऱ्या राजकीय नेत्यांनाही कडक शब्दांत सुनावले आहे. त्यांच्या या विधानांमुळे आता सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
एमआयडीसीविरोधातील आंदोलनात भिडे गुरुजी सहभागी
कोल्हापुरातील शिरोळ तालुक्यामध्ये सैनिक टाकळी येथे प्रस्तावित एमआयडीसीविरोधात ग्रामस्थ, माजी सैनिक, शेतकरी व महिलांनी मंगळवारी शिरोळ तहसील कार्यालयावर ‘जनआक्रोश मोर्चा’ काढला. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे यांच्या उपस्थितीमुळे मोर्चाला मोठी धार आली. शिरोळमध्ये मुख्य रस्त्यावरून हजारो माजी सैनिक, महिला आणि ग्रामस्थांकडून घोषणाबाजी करत हा मोर्चा काढण्यात आला होता. तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर पोलिसांनी आंदोलकांना रोखल्यानंतर धक्काबुक्की झाली. संतप्त आंदोलकांनी लोखंडी गेट तोडून कार्यालयाच्या आवारात प्रवेश केला. यावेळी काही काचेच्या दरवाज्याचीही तोडफोड झाली. प्रशासनाने निवेदन स्वीकारल्यानंतर तहसील कार्यालयात करण्यात आलेले धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले.
एमआयडीसी रद्द करून कारवाईची मागणी
प्रस्तावित एमआयडीसी पूर्णपणे रद्द करून प्रक्रियेची चौकशी करावी आणि आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यावर कारवाई करावी, अशी आंदोलकांची प्रमुख मागणी आहे. सुमारे 127 एकर गायरान जमिनीवर प्रस्तावित प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध असून, ही जमीन सैनिक स्कूल, सैन्यपूर्व प्रशिक्षण केंद्र, क्रीडांगण व रोजगारनिर्मितीसाठी वापरण्याची त्यांची मागणी आहे.
दरम्यान, 18 ऑगस्टच्या बैठकीत चौकशी पूर्ण होईपर्यंत एमआयडीसी की प्रक्रिया स्थगित ठेवण्याचे निर्देश देण्यात आले असून, 4 सप्टेंबरला गायरान जमिनीची संयुक्त पाहणी झाली आहे. तर आता या आंदोलनातून आंदोलकांनी मागण्या मान्य न झाल्यास मुख्यमंत्री यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी मोर्चा काढण्याचा इशारा आंदोलन अंकुशचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील यांनी दिला आहे.