रेवती सुळे आणि सारंग लखानी यांच्या विवाह सोहळ्याला अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. मुंबईत मोठ्या थाटामाटात हा विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्यातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे आणि प्रसिद्ध व्यवसायिक अरुण लखानी यांचे पुत्र सारंग लखानी यांचा विवाह सोहळा नुकताच मुंबईत संपन्न झाला. रेवती आणि सारंग यांच्या विवाह सोहळ्याला अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. सिनेतारकांपासून ते राज्य आणि देशाच्या राजकारणातील दिग्गज मंडळींनी या विवाहाला हजेरी लावली होती. या हाय प्रोफाईल विवाह सोहळ्याचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यापैकीच एक व्हिडीओ हा समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज यांचा आहे.
प्रिया सरोज यांनी स्वत: हा व्हिडीओ आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर अल्पावधित व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ चांगलाच चर्चेला कारण ठरतोय. या व्हिडीओवर अनेकांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. यामध्ये खासदार सुप्रिया सुळे आणि प्रिया सरोज यांच्यातील मैत्रीच्या नात्यातील गोडवा बघायला मिळतोय.
व्हिडीओत नेमकं काय आहे?
प्रिया सरोज या मंचावर नवरदेव-नवरी यांची भेट घेण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठी आल्या होत्या. पण मंचावर फोटो काढण्यासाठी गर्दी होती. यामुळे प्रिया सरोज या काहीशा गोंधळात पडलेल्या आणि एकट्या पडलेल्या बघायला मिळाल्या. यावेळी त्यांच्या मनात होणारी घालमेल त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. हीच घालमेल अगदी योग्यवेळी सुप्रिया सुळे यांनी टिपली.
सुप्रिया सुळे यांनी एकही सेकंद वाया न घालवता त्या प्रिया सरोज यांच्याजवळ गेल्या. त्यांनी प्रिया सरोज यांचा हात धरला आणि रेवतीसोबत गाठ घडवून दिली. यावेळी रेवतीने हात जोडून नमस्कार केला. सुप्रिया एवढ्यावरच थांबल्या नाहीत तर त्यांनी मंचावर उपस्थित असलेले आपले व्याही अरुण लखानी यांच्याकडे प्रिया यांना नेले. तिथे त्यांनी प्रिया यांची ओळख अरुण लखानी यांच्यासोबत करुन दिली. यावेळी अरुण लखानी यांनी प्रिया यांना हात जोडून नमस्कार केला. त्यांनी तो स्वीकारला.
यानंतर सुप्रिया सुळे यांनी प्रिया सरोज यांना नवरदेव-नवरीसोबत फोटो काढण्यासाठी नेलं आणि फोटो काढला. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात अत्यंत अचूकपणे कैद झाला. या सर्व घडामोडींचा व्हिडीओ प्रिया सरोज यांनी इन्स्टाग्रावर शेअर करत सुप्रिया सुळे यांचे ‘ताई’ म्हणत आभार मानले आहेत.
पाहा खास व्हिडीओ
प्रिया सरोज नेमक्या कोण आहेत?
प्रिया सरोज या उत्तर प्रदेशच्या मच्छलीशहर मतदारसंघाच्या खासदार आहेत. प्रिया या समाजवादी पक्षाचे नेते तुफानी सरोज यांच्या कन्या आहेत. तुफानी सरोज हे सध्या केरकटचे आमदार आहेत. वडिलांचा राजकीय वारसा प्रिया आता बरोबरीने पुढे नेत आहेत. प्रिया यांनी वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी पहिल्यांदाच 2024 ची लोकसभेची निवडणूक लढली. या निवडणुकीत मोदी लाट असतानादेखील उत्तर प्रदेशात प्रिया सरोज यांचा विजय झाला. वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी खासदार होणाऱ्या त्या तरुण खासदार आहेत. त्यांनी कायद्याचं शिक्षण घेतलं आहे. लोकसभेत प्रिया सरोज यांचं भाषण देखील गाजलं आहे.
खासदार सुप्रिया सुळे आणि प्रिया सरोज या दिल्लीत एकाच सभागृहात काम करतात. तसेच दोन्ही खासदार या विरोधी पक्षांमध्ये आहेत. समाजवादी पक्ष देखील विरोधी पक्षात आहे, आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षही विरोधी पक्षात आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांचे विचार जुळताना दिसतात. यातूनच 25 वर्षांच्या असलेल्या प्रिया सरोज या सुप्रिया सुळे यांच्या मैत्रीण बनल्या.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा