• Wed. Aug 5th, 2026
    Omraje Nimbalkar: मोठा ट्विस्ट! माझा शिंदेसेनेत जाण्याचा निर्णय झालेला नाही; ओमराजे माघारी फिरल्यास ५ बंडखोर खासदारांचा गेम होणार!

    Shivsena News: ओमराजे निंबाळकर यांची सध्या राजकीय कोंडी झाली असून मी अद्याप निर्णय घेतलेला नाही, असं सांगत त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेतून बंड करण्याच्या तयारीत असणाऱ्या इतर खासदारांचीही धाकधूक वाढवली आहे.

    माझा शिंदेसेनेत जाण्याचा निर्णय झालेला नाही; ओमराजे माघारी फिरल्यास ५ बंडखोर खासदारांचा गेम होणार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येप्रकरणी अखेर २० वर्षांनी विशेष सीबीआय न्यायालयाने आपला निकाल दिला आहे. सबळ पुराव्यांअभावी न्यायालयाने माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह इतर सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. या निकालानंतर ओमराजे निंबाळकर यांनी प्रतिक्रिया देत आपण याप्रकरणी उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. तसंच यावेळी ओमराजेंनी राजकीय निर्णयावरही भाष्य करत मी अद्याप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतलेला नाही, असा खुलासाही त्यांनी केला आहे. ओमराजेंच्या या वक्तव्याने ‘ऑपरेशन टायगर’ला ब्रेक लागणार का, याबाबतच्या चर्चांना उधाण आलं असून शिंदेंच्या गोटात अस्वस्थता निर्माण होण्याची शक्यता आहे.

    “माझ्यासाठी २० जून हा दिवस आयुष्यातील सर्वांत महत्त्वाचा दिवस असून माझ्या वडिलांच्या हत्या प्रकरणाच्या निकालानंतर मी माझी राजकीय दिशा स्पष्ट करेन,” असं दोन दिवसांपूर्वी ओमराजे निंबाळकर यांनी स्पष्ट केलं होतं. त्यानुसार आज हत्या प्रकरणाचा निकाल जाहीर झाल्यानंतर ओमराजे यांनी वृत्तवाहिनांना आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी शिंदेंच्या शिवसेनेतील प्रवेशाविषयी विचारले असता ते म्हणाले की, “मी अद्याप याबाबत निर्णय घेतलेला नाही. माझ्या मतदारसंघात जाऊन लोकांशी चर्चा करून मी पुढील निर्णय घेणार आहे,” असं ओमराजेंनी स्पष्ट केलं. एकीकडे ओमराजे निंबाळकर यांच्यासह ठाकरेंच्या शिवसेनेतील एकूण ६ खासदारांनी आपला स्वतंत्र गट स्थापन करून शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात असताना अद्याप माझा निर्णय बाकी असल्याचं सांगत ओमराजेंनी इतर बंडखोर खासदारांची धाकधूक वाढवली आहे.

    ओमराजे माघारी फिरल्यास इतर ५ खासदारांचा करेक्ट कार्यक्रम!

    एखाद्या राजकीय पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना दुसऱ्या पक्षात प्रवेश करायचा असेल तर त्यांच्यासमोर दोन पर्याय असतात. पहिला पर्याय म्हणजे आपल्या पदाचा राजीनामा देऊन थेट दुसऱ्या पक्षात जाणे आणि पुन्हा निवडणुकीला सामोरे जाणे. तर दुसरा पर्याय म्हणजे आपल्यासोबत निवडून आलेल्या इतर किमान दोन तृतीयांश सदस्यांचा स्वतंत्र गट स्थापन करून नंतर हा संपूर्ण गट दुसऱ्या पक्षात विलीन करणे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोकसभेत नऊ खासदार निवडून आले होते. यातील दोन तृतीयांश म्हणजे सहा खासदारांनी बंड केल्याचं आता स्पष्ट झालं आहे. मात्र यातील एकाही खासदाराने आपला निर्णय बदलल्यास दोन तृतीयांशसाठी आवश्यक असलेली संख्या गाठता येत नाही. त्यामुळे मग उर्वरित पाच खासदारांनीही आपला निर्णय बदलावा लागू शकतो किंवा मग थेट अपात्रतेच्या कारवाईला सामोरे जाऊ लागू शकते.

    ओमराजे मतदारसंघात जाऊन काय निर्णय घेणार?

    मी मतदारसंघातील लोकांशी चर्चा करून पुढील राजकीय निर्णय घेणार, असं ओमराजे निंबाळकरांनी स्पष्ट केलं आहे. धाराशिव जिल्ह्यात पद्मसिंह पाटील यांचे कुटुंब ओमराजेंचे प्रमुख राजकीय प्रतिस्पर्धी आहे. हे पाटील कुटुंब सध्या भाजपसोबत असून ओमराजे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांना मित्रपक्ष असलेल्या भाजपसोबत पर्यायाने पाटील कुटुंबासोबतही जुळवून घ्यावं लागणार आहे. त्यामुळे ओमराजेंसाठी शिंदेसेनेतील प्रवेश वाटतो तितका सोपा नाही. तर दुसरीकडे, नुकत्याच एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीतून ओमराजेंनी आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाबद्दल शंका उपस्थित करत टीका केली होती. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेत परतीचा मार्गही त्यांच्यासाठी तितकासा सुकर ठरणार नाही. त्यामुळे ते आगामी काही दिवसांत नेमका काय निर्णय घेतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा