मुंबई : शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना “जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आज शिवसेनेचा साठावा वर्धापन दिन आहे, साठावा वर्धापन दिन हा हिरक महोत्सव असतो. त्यामुळे नेहमीप्रमाणे मी माझ्या भाषणाची सुरुवात केलेली असली, तरी आज विशेष म्हणजे तुम्हा सगळ्यांना उद्देशून बोलत आहे. तुम्ही माझे आहातच, पण मला दिलेल्या हिऱ्यापेक्षा मौल्यवान, जीवाला जीव देणाऱ्या शिवसैनिक बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, ही देणगी माझी वडिलोपार्जित आहे. त्यामुळे कोणी माय का लाल ही देणगी माझ्यापासून हिरावून घेऊ शकत नाही,” असे ठाकरे म्हणाले.
“अनेकांना वाटलं असेल की दुःखी आणि कष्टाने खचून गेलेला शिवसैनिक इथे दिसेल. पण इथे एकसुद्धा शिवसैनिक खचलेला नाही, उलट पेटलेला आहे,” असे उद्धव ठाकरे म्हणाले. पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “अनेक जण मला सांगतात की उद्धवजी, आता तरी आदेश द्या. पण आदेश तर बाळासाहेब कधीच देऊन गेले आहेत.”
सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना ठाकरे म्हणाले, “अनेक जण याला संकट म्हणत आहेत. पण हे काही संकट नाही. मगाशी चंद्रकांत खैरे जे बोलले, तेच माझंही मत आहे. ज्या वेळेपासून आपण आपलं यश-अपयश निवडणुकीच्या निकालांशी जोडायला लागलो, तिथेच आपण फसलो.” सत्तेच्या राजकारणावर टीका करत उद्धव ठाकरे म्हणाले, “चोरी म्हणू नका, ऑपरेशन गोल्ड म्हणा. त्याशिवाय आता डॉक्टरही गोंधळले आहेत की आपण चोरी करतोय की ऑपरेशन करतोय. पण अशी ऑपरेशनं होत असतील, तर तुम्हा सगळ्यांना आणि देशाला मिळून ऑपरेशन कमळ करावं लागेल. हा लोकशाहीला असलेला धोका आहे. देश असाच चालत राहिला तर तो अराजकाच्या दिशेने जात असल्याची भीती मला वाटते. मी भविष्यात डोकावणारा नाही. ज्योतिषावर माझा अजिबात विश्वास नाही. पण समोर दिसणारी परिस्थितीच भवितव्य दाखवते. ज्या देशात तरुणाईला झुरळ म्हटलं जातं, त्या देशाचं भविष्य काय असणार?
शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना उद्देशून उद्धव ठाकरे म्हणाले, “समजा उद्यापासून शिवसेना निवडणूकच लढवणार नाही. मग काय करणार आहेत ते? तुमच्यापैकी किती जण माझ्यासोबत राहतील? एकही तिकीट मिळणार नाही, तरी काय करणार आहेत ते? मेहनत तुम्ही करायची, निवडून आपण आणायचं आणि नंतर खोके द्यायचे. शेतकरी रडतोय. त्याच्या मालाला हमीभाव नाही. पण आमदार-खासदारांचा हमीभाव ठरलेला आहे. शेतकऱ्याला कर्जमुक्ती द्यायची नाही, त्याच्या मालाला योग्य किंमत द्यायची नाही. पण आमदार, खासदार आणि नगरसेवक विकत घ्यायचे. एवढा पैसा तुमच्याकडे आहे. निवडणुकीआधी लाडकी बहीण योजना आणली आणि आता ८० लाख महिलांची ओवाळणीच काढून घेतली. काय टर्रेबाजी करत होते. दाढी खाजवत फिरत होते. काय मिळालं? मिळालं की नाही?”
कार्यकर्त्यांना जाब विचारण्याचं आवाहन करत उद्धव ठाकरे म्हणाले, “मेहनत तुम्ही केली. निवडून तुम्ही दिलं. मग जाब विचारण्याचा अधिकार तुम्ही का सोडत आहात? मी आदेश दिला होता की निवडून आणा, तुम्ही निवडून दिलं. त्यामुळे प्रश्न विचारण्याचा अधिकार तुमचा आहे. तो वापरा,” असं ठाकरे म्हणाले.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा