B T Deshmukh Passes Away: डॉ. बी. टी. देशमुख यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले आहे. ते अमरावती पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार, नुटाचे शिल्पकार आणि विदर्भाच्या विकासासाठी आयुष्यभर लढणाऱ्या अभ्यासू नेतृत्व म्हणून प्रसिद्ध होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह विविध मान्यवरांकडून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.
नागपूर विद्यापीठ शिक्षक संघटना अर्थात नुटाला संघटनात्मक बळ देण्यात त्यांचा मोठा वाटा होता. शिक्षक, प्राध्यापक आणि पदवीधरांच्या विविध प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने संघर्ष केला. शिक्षण क्षेत्रातील धोरणात्मक बदलांवरही त्यांनी प्रभावी भूमिका मांडली होती. विदर्भातील सिंचन अनुशेषाचा मुद्दा राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आणण्याचे श्रेयही डॉ. देशमुख यांना दिले जाते. या प्रश्नावर त्यांनी सातत्याने पाठपुरावा करत विदर्भाला न्याय मिळावा यासाठी आवाज उठवला. विकासातील प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले.
त्यांच्या निधनानंतर विविध राजकीय पक्षांचे नेते, शिक्षणतज्ज्ञ, माजी सहकारी आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे. डॉ. देशमुख यांच्या पार्थिवावर शनिवारी सायंकाळी ५ वाजता अमरावती येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. डॉ. बी. टी. देशमुख यांच्या रूपाने अभ्यासू, प्रामाणिक आणि तत्त्वनिष्ठ संसदीय परंपरेचा एक महत्त्वाचा अध्याय संपल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.
Uddhav Thackeray : सहा खासदारांच्या फुटीनंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ‘हा लोकशाहीला धोका, देश अराजकतेच्या दिशेला’
माझ्या जीवनातील एक मार्गदर्शक मी गमावला आहे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
आपल्या शोकसंदेशात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “ज्यासाठी संघर्ष केला, त्यासाठी जीवन समर्पित असेच आयुष्य ते जगले. मला तर त्यांच्याकडून व्यक्तिगतदृष्ट्या खूप काही शिकायला मिळाले. त्यांचे कायमच मोलाचे मार्गदर्शन मिळायचे. राजकारण आणि समाजकारण एकच आहे, असे मानणार्या पिढीचे ते नेतृत्त्व करीत होते. अमरावती पदवीधर मतदारसंघाचे विधानपरिषदेत त्यांनी पाचवेळा प्रतिनिधीत्त्व केले. प्राध्यापक, शिक्षकांच्या हक्कांसाठी तर ते लढलेच, पण अनेक सामाजिक प्रश्नांना त्यांनी विशेषत्त्वाने वाचा फोडली. एक अत्यंत अभ्यासू आणि प्रेरणादायी असे हे व्यक्तिमत्त्व होते. विधानपरिषदेतील त्यांची भाषणे ऐकत रहावी वाटायची. ती आजही नवीन सदस्यांसाठी प्रेरणादायी आहेत. विदर्भाच्या अनुशेषाविरोधात त्यांनी दिलेला लढा अत्यंत मोलाचा होता. मला आजही आठवते, सरकारी दरबारी भांडून न्याय मिळत नाही, म्हणून त्यांनी अनुशेष निर्मूलनासाठी थेट हायकोर्टात याचिका केली होती. सुनावणीच्यावेळी बी.टी. सरांसोबत मीही उपस्थित राहत होतो. सिंचन, पेयजल योजना यासाठी त्यांनी सातत्याने संघर्ष केला. अमरावती विद्यापीठाच्या निर्मितीत सुद्धा त्यांचे योगदान होते. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत.”
महान शिक्षक व निष्कांचन लोकप्रतिनिधीला मुकलो- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व माजी आमदार प्रा. बी. टी. देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या निधनाने विकासाच्या निर्मळ विचाराला मुकल्याची भावना व्यक्त करत बावनकुळे म्हणाले की, “देशमुख हे विदर्भाचे त्रिकालदर्शी नेतृत्व होते. शिक्षक, पदवीधर आणि विदर्भाच्या विकासासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. सलग पाच वेळा विधान परिषदेवर निवडून जात त्यांनी शिक्षण, पाणी, रोजगार आणि उद्योग या मुद्द्यांवर भरीव काम केले. नुटा संघटनेच्या माध्यमातून शिक्षकांसाठी केलेले कार्य अजरामर असून, विदर्भ अनुशेषाचा प्रश्न राष्ट्रीय पातळीवर पोहोचवण्यात त्यांचा मोठा वाटा होता. “महान शिक्षक आणि निष्कांचन लोकप्रतिनिधीला आपण मुकलो आहोत,” अशा शब्दांत बावनकुळे यांनी शोक व्यक्त केला.
