• Fri. Aug 7th, 2026
    पिता संजय दिना पाटील ठाकरेसेनेतून बाहेर, कन्या राजूल पाटील यांचीही दिशा ठरली, शिवसेनेच्या 60 व्या वर्धापन दिनी भूमिका जाहीर

    Maharashtra Politics : पित्यापाठोपाठ राजूल पाटीलही शिवसेनेची वाट धरणार का, असा सवाल ठाकरेसेनेतूनच उमटू लागला. त्यानंतर शिवसेनेच्या वर्धापनदिनी त्यांनी सोशल मीडियातून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सहा खासदार फुटल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आमदार-नगरसेवकांमध्येही चलबिचल वाढली. ईशान्य मुंबईचे लोकसभा खासदार संजय दिना पाटील यांनीही ठाकरेंची साथ सोडत वेगळा गट स्थापन करणाऱ्या खासदारांच्या गोटात सहभाग घेण्याचा निर्णय घेतला. मात्र महत्त्वाची गोष्ट म्हणजे संजय दिना पाटील यांच्या कन्या राजूल पाटील या ठाकरेंच्या ‘मशाल’ चिन्हावर मुंबई महापालिकेत नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. त्यामुळे त्याही पित्यापाठोपाठ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेची वाट धरणार का, असा सवाल ठाकरेसेनेतूनच उमटू लागला. परंतु शिवसेनेच्या वर्धापनदिनी राजूल पाटील यांनी सोशल मीडियातून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

    राजूल पाटील यांच्या भूमिकेवरुन सवाल

    राजूल संजय पाटील या नुकत्याच झालेल्या बीएमसी निवडणुकीत मुंबईच्या भांडुप परिसरातील प्रभाग क्रमांक ११४ मधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ‘मशाल’ चिन्हावर नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. त्या आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वातील युवासेनेच्या कार्यकारिणी सदस्याही आहेत. नुकतंच ठाकरे गटात पडलेल्या उभ्या फुटीत पक्षाबाहेर पडलेल्या सहा खासदारांमध्ये ईशान्य मुंबईचे लोकसभा खासदार संजय दिना पाटील यांचाही समावेश आहे. राजूल या संजय पाटील यांच्या कन्या. त्यामुळे पित्यामागून त्याही पक्षाला सोडचिठ्ठी देतील, असा सूर ठाकरे गटातूनच उमटू लागला.

    राजूल यांच्या गैरहजेरीची चर्चा

    याला कारण ठरली राजूल पाटील यांची अनुपस्थिती. मुंबई महापालिकेच्या सभागृहात बुधवारी ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर आणि माजी महापौर हरेश्वर पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी शिवसेना (उबाठा) पक्षाचे ६५ पैकी ६४ नगरसेवक उपस्थित होते, परंतु राजुल पाटील या गैरहजर राहिल्याने त्या नेमक्या कुठे गेल्या ही चर्चा सुरु झाली.
    Maharashtra TimesUddhav Thackeray : ठाकरेंना पुन्हा झटका, BMC नगरसेवकांची संख्या घटली, किशोरी पेडणेकरांकडून सभागृहात विरोध, 6 महिन्यांच्या मुदतीची आठवण

    किशोरी पेडणेकरांची टीका

    विशेष म्हणजे, ‘गद्दार गेले, संजय दिना पाटील यांच्या कन्येचा एक पाय इकडे आणि एक पाय तिकडे, कन्येचे नंतर बघू,’ अशा शब्दात मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी टोलाही लगावला. परंतु पित्याने वेगळी भूमिका घेतल्याने निर्माण झालेल्या सुरक्षेच्या कारणास्तव भांडुपमधील घरी राहणेच राजुल पाटील यांनी पसंत केल्याचे सांगितले जाते.

    ठाकरेंच्या फुटलेल्या खासदारांच्या मतदारसंघात शरद पवार येणार, नवं वादळ घोंगावणार?

    वर्धापन दिनी भूमिका जाहीर

    १९ जून हा शिवसेनेचा ६० वा वर्धापन दिवस . याचं निमित्त साधत राजूल पाटील यांनी सोशल मीडियावर आपली भूमिका जाहीर केली. त्यांनी फोटो शेअर करताना ‘तमाम शिवसैनिकांना शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!’ असं लिहिलंय. तर फोटोवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नाव आणि मशाल चिन्हही आहे. सोबत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचेही फोटो असल्याने त्या ठाकरे गटासोबत असल्याचे स्पष्ट होते.
    Maharashtra TimesPune News : लग्नासाठी 14 कोटींचा महाल बूक, पण त्याआधीच आक्रित; होणाऱ्या पत्नीसोबत लोहगडावर ट्रेकिंग, पुण्यातील तरुणाचा वेदनादायी शेवट

    राजूल पाटील यांची भूमिका स्पष्ट झाल्यानंतर ठाकरे गटातून काय प्रतिक्रिया उमटणार, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा