कोल्हापूर दि. ९ (जिमाका) : शिक्षण, सहकार, उद्योग अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी प्रचंड मोठे कार्य उभे केले. त्यांनी सामान्य माणसाला दिलासा देण्याचे काम केले, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या यशवंत निवासस्थानी भेट देऊन पाटील कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी त्यांच्यासोबत विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार धनंजय महाडिक, आमदार अशोकराव माने, आमदार राहुल आवाडे, आमदार शिवाजी पाटील उपस्थित होते. यावेळी त्यांनी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

त्यानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, राज्यपाल म्हणून पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी तीन राज्यांची जबाबदारी पार पाडली. त्यापूर्वी आमदार तसेच अन्य निरनिराळ्या पदांवर काम करताना प्रत्येक कामात त्यांनी आपला एक ठसा उमटवला. ते केवळ नेते नव्हते, तर ते एक विचारवंत होते. एक कृतार्थ जीवन डी. वाय. दादा जगले. संपूर्ण जीवनाला समृद्ध करेल, असा विचार त्यांच्याकडे होता. त्यांच्या पश्चात त्यांच्या मुलांनी, कुटुंबियांनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचे विचार जपण्याचे कार्य केले आहे. त्यांच्यासारखे नेते आपल्यातून निघून जाणे ही महाराष्ट्राकरिता मोठी हानी आहे.
यावेळी डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष संजय डी. पाटील, आमदार सतेज पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

000