• Wed. Jun 17th, 2026
    Smart Meter Controversy: स्मार्ट मीटर बसवलं नाही तर काय? वाढत्या विरोधानंतर महावितरणकडून सगळ्या प्रश्नांची उत्तरं आली

    Smart Meter MSEDCL: राज्यात स्मार्ट मीटर बसवण्याच्या मोहिमेला वेग आला आहे. असं असतानाच अनेक शहरांमध्ये नागरिकांकडून विरोधही होत आहे. स्मार्ट मीटरमुळे वीजबिल वाढत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. यावर आता महावितरणने सविस्तर स्पष्टीकरण दिलं आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : राज्यात पावसाने अद्याप जोर धरलेला नसल्याने उष्णतेचा त्रास वाढला आहे. तापमान वाढल्याने विजेचा वापरही वाढला असून अनेक भागांत वीज मागणीचा ताण जाणवत आहे. अशा परिस्थितीत महावितरणने स्मार्ट मीटर बसविण्याची मोहीम वेगाने सुरू केली आहे. मात्र, या मोहिमेला अनेक ठिकाणी नागरिकांकडून विरोध होताना दिसत आहे. ठाणे जिल्ह्यासह अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण आणि डोंबिवली परिसरात स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरू आहे. ग्राहकांना ४८ तासांत मीटर बदलण्यात येणार असल्याचे संदेशही पाठविले जात आहेत. मात्र, स्मार्ट मीटरमुळे वीजबिले वाढत असल्याचा आरोप करत काही नागरिकांनी या उपक्रमाला विरोध दर्शविला आहे. काही गृहनिर्माण संस्थांनी तर मीटर बॉक्सलाच कुलूप लावल्याची माहिती समोर आली आहे.

    स्मार्ट मीटरबाबत महावितरणचे स्पष्टीकरण

    स्मार्ट मीटरविरोधातील वाढत्या चर्चेनंतर महावितरणने सामाजिक माध्यमांवर व्हिडीओ प्रसिद्ध करून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. जुन्या मीटरच्या जागी अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित स्मार्ट मीटर बसविण्यात येत असून त्यातून ग्राहकांना विविध सुविधा मिळणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. महावितरणच्या माहितीनुसार, सकाळी ९ ते सायंकाळी ५ या कालावधीत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना प्रतियुनिट ८० पैसे ते १ रुपयांपर्यंत सवलत मिळू शकते. तसेच हे मीटर पूर्णपणे मोफत असून पोस्टपेड स्वरूपाचे आहेत.

    मोबाईलवर मिळणार वीज वापराची माहिती

    स्मार्ट मीटरमुळे मीटर रीडिंगची प्रक्रिया स्वयंचलित होणार आहे. त्यामुळे चुकीची बिले येण्याची शक्यता कमी होईल, असा दावा महावितरणने केला आहे. ग्राहकांना त्यांच्या मोबाईलवरील अॅपद्वारे दर अर्ध्या तासाने वीज वापराची माहिती पाहता येणार आहे.

    Maharashtra TimesTIME Magazine 2026: जगभरात विराट-रोहित अन् वैभवची हवा, पण टाइमने निवडलं दुसरंच नाव; भारतीय क्रिकेटपटूचा मोठा सन्मान

    युनिट जास्त दाखवण्याचा आरोप कितपत खरा?

    स्मार्ट मीटर अधिक युनिट दाखवतात, अशी चर्चा काही ठिकाणी सुरू आहे. मात्र, याबाबत महावितरणने स्पष्टीकरण देताना स्मार्ट मीटर वीज वापराची तात्काळ नोंद करतात, तर जुन्या डिजिटल मीटरमध्ये काही प्रमाणात विलंबाने नोंद होत असल्याचे सांगितले. त्यामुळे बिल वाढल्याचा भास होऊ शकतो, मात्र मीटर प्रत्यक्ष वापराइतकीच वीज मोजतो, असे महावितरणचे म्हणणे आहे.

    डेटा सुरक्षिततेबाबतही खुलासा

    स्मार्ट मीटरमधील माहिती पूर्णपणे एनक्रिप्टेड असल्याचा दावा महावितरणने केला आहे. या प्रणालीमध्ये छेडछाड करणे शक्य नसून कोणतीही संशयास्पद हालचाल झाल्यास ती तातडीने लक्षात येते, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. ४८ तासांत मीटर बदलले नाही तर वीज पुरवठा खंडीत करणार असल्याच्या दाव्यांमध्ये काही तथ्य नसल्याचेही महावितरणने सांगितले आहे.

    स्मार्ट मीटरचे फायदे कोणते?

    महावितरणच्या मते, स्मार्ट मीटरमुळे प्रत्यक्ष मीटर रीडरची गरज कमी होणार आहे. ग्राहकांना अचूक बिल मिळेल, तक्रारींचे जलद निराकरण होईल आणि वीज वापरावर थेट नियंत्रण ठेवता येईल. तसेच सौरऊर्जा उपलब्ध असलेल्या वेळेत वीज वापरल्यास अतिरिक्त सवलतीचाही लाभ ग्राहकांना मिळू शकतो. बँकिंग, रेल्वे आणि मोबाईल सेवा जशा डिजिटल आणि स्मार्ट झाल्या आहेत, त्याच धर्तीवर वीज वितरण व्यवस्थाही आधुनिक करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा