• Fri. Jun 19th, 2026

    ‘गुणसागर निर्गुणी’ मधून उलगडणार गुरुवर्य पं. नीळकंठ अभ्यंकर यांच्या अमूल्य संगीत रचनांचा सुरेल ठेवा – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jun 15, 2026
    ‘गुणसागर निर्गुणी’ मधून उलगडणार गुरुवर्य पं. नीळकंठ अभ्यंकर यांच्या अमूल्य संगीत रचनांचा सुरेल ठेवा – महासंवाद

    मुंबई, दि. १५ : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने ज्येष्ठ संगीतकार गुरुवर्य पं. नीळकंठ अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘गुणसागर निर्गुणी – अमूल्य संगीत रचनांचा जागर’ या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ३२ गुणवंत गायक, गायिका आणि लोकप्रिय कलावंतांच्या संचातील हा अभिनव सांगीतिक आविष्कार बुधवार, १७ जून २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता प्रभादेवी, मुंबई येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे रसिकांच्या भेटीला येणार आहे.

    गुरुवर्य पं. नीळकंठ अभ्यंकर यांनी आपल्या प्रतिभासंपन्न संगीत रचना, चिंतनशील सांगीतिक दृष्टिकोन आणि अभिजात संगीताच्या माध्यमातून भारतीय संगीतविश्वात स्वतंत्र स्थान निर्माण केले. त्यांच्या रचनांमधील भावस्पर्शी सूर, आध्यात्मिक विचार आणि कलात्मक समृद्धी आजही रसिकांना मंत्रमुग्ध करतात. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमातून त्यांच्या अमूल्य संगीत वारशाला कृतज्ञ अभिवादन करण्यात येणार आहे.

    ‘गुणसागर निर्गुणी’ या कार्यक्रमाची संकल्पना आणि दिग्दर्शन डॉ. वर्षा भावे यांनी केले असून, संगीत संयोजनाची जबाबदारी कमलेश भडकमकर यांनी सांभाळली आहे. या कार्यक्रमात ३२ गुणवंत गायक, गायिका आणि लोकप्रिय कलावंत पं. अभ्यंकर यांच्या निवडक आणि अजरामर संगीत रचनांना आपल्या सुरेल आवाजातून नव्याने सादर करणार आहेत.या कार्यक्रमात वाद्यसाथीसाठी अर्चिस लेले, निषाद करगीलकर, हनुमंत रावडे, अमोघ दांडेकर, भरत भडकमकर, दर्शना जोग, दीप वझे, प्रणव हरिदास आणि कमलेश भडकमकर हे नामवंत वादक सहभागी होणार असून त्यांच्या सुरेल साथसंगतीमुळे कार्यक्रमाची रंगत अधिक खुलणार आहे.

    महाराष्ट्राच्या समृद्ध सांगीतिक परंपरेचे जतन व संवर्धन करून हा सांस्कृतिक वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम साकार होत आहे.

    या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असून संगीतप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गुरुवर्य पं. नीळकंठ अभ्यंकर यांच्या अमूल्य संगीत रचनांचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडेयांनी केले आहे.

    ००००

    संजय ओरके/विसंअ

     

     

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed