• Mon. Jun 15th, 2026

    कलमठ येथे ‘शाळा प्रवेशोत्सव’ उत्साहात; शिक्षण क्षेत्रात अभिनव उपक्रम राबविण्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jun 15, 2026
    कलमठ येथे ‘शाळा प्रवेशोत्सव’ उत्साहात; शिक्षण क्षेत्रात अभिनव उपक्रम राबविण्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन – महासंवाद

    सिंधुदुर्गनगरी, दि. १५: शिक्षण हा सामाजिक परिवर्तनाचा सर्वात प्रभावी मार्ग असून प्रत्येक बालकाला गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन, प्रशासन, शिक्षक, पालक आणि समाज यांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. सिंधुदुर्ग जिल्हा साक्षरतेत आघाडीवर असून येथील शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत. तसेच देशातील इतर राज्यांमध्ये शिक्षण क्षेत्रात राबविण्यात येणाऱ्या अभिनव उपक्रमांचा अभ्यास करून ते जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.

    कणकवली तालुक्यातील कलमठ येथील कुंभारवाडी प्राथमिक शाळेत आयोजित ‘शाळा प्रवेशोत्सव’ कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, पालकांचा उत्साह आणि शिक्षकांची तयारी यामुळे संपूर्ण परिसरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते.

    शाळा प्रवेशोत्सवांतर्गत इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. ‘पहिले पाऊल’ या संकल्पनेअंतर्गत नवागत विद्यार्थ्यांच्या पायाचा ठसा घेऊन त्याची आकर्षक प्रत पालकांना भेट देण्यात आली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील पहिला दिवस संस्मरणीय ठरला. यावेळी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके व गणवेशांचे वितरण करण्यात आले. यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी विद्यार्थ्यांनी बनविलेल्या प्रयोगांची आणि कलाकृतींची देखील पाहणी केली. शाळेच्या पहिल्याच दिवशी मिळालेल्या या शैक्षणिक साहित्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

    या कार्यक्रमास जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, पंचायत समिती सभापती हर्षदा वाळके, जिल्हा परिषद सदस्या सुप्रिया मेस्त्री, सरपंच संदीप मेस्त्री यांच्यासह पालक, शिक्षक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    पालकमंत्री श्री. राणे म्हणाले की, शिक्षणाचा पहिला दिवस हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा आणि अविस्मरणीय क्षण असतो. या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत आनंददायी वातावरणात झाल्यास त्यांचा आत्मविश्वास आणि शाळेविषयीची ओढ वाढते. शाळा प्रवेशोत्सव हा केवळ औपचारिक कार्यक्रम नसून विद्यार्थ्यांमध्ये शाळेबाबत आकर्षण निर्माण करणे, पालकांचा विश्वास दृढ करणे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांविषयी सकारात्मक वातावरण निर्माण करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘शाळा प्रवेशोत्सव’च्या माध्यमातून नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत, शैक्षणिक साहित्याचे वितरण आणि पालकांचा सहभाग यामुळे शिक्षणाविषयी सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. प्रत्येक बालक शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात यावे आणि सिंधुदुर्ग जिल्हा ‘शिक्षणसमृद्ध जिल्हा’ म्हणून अधिक सक्षम व्हावा, या उद्देशाला या उपक्रमामुळे निश्चितच बळ मिळणार असल्याची भावना देखील पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.

    जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सांगितले की, सर्व मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे, शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील पटसंख्या वाढविणे आणि शाळेच्या पहिल्या दिवसाचे उत्सवात रूपांतर करणे या उद्देशाने ‘शाळा प्रवेशोत्सव’ राबविण्यात येत आहे. मागील वर्षीच्या उपक्रमामुळे पटसंख्येतील घट कमी होण्यास मदत झाली असून शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

    मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी सांगितले की, या उपक्रमात लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची सक्रिय भूमिका निश्चित करण्यात आली आहे. प्रत्येक लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्याने किमान एका शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करायचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्यासोबतच शिक्षणाविषयी सकारात्मक वातावरण निर्माण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

    ००००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed