• Wed. Jun 17th, 2026

    नाशिक जिल्ह्यात दोन महत्वाच्या सर्वेक्षणांचा शुभारंभ – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jun 13, 2026
    नाशिक जिल्ह्यात दोन महत्वाच्या सर्वेक्षणांचा शुभारंभ – महासंवाद

    नाशिक, दि. १३ जून (जिमाका वृत्तसेवा) : राज्यातील रोजगार, बेरोजगारी, महिला कामगार सहभाग तसेच असंघटित क्षेत्रातील उद्योग-व्यवसायांची अद्ययावत व विश्वासार्ह माहिती उपलब्ध व्हावी यासाठी जून ते डिसेंबर २०२६ या कालावधीत नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण (PLFS) आणि असंघटित क्षेत्रातील उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण (ASUSE) या दोन महत्त्वपूर्ण सर्वेक्षणे राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यात ही दोन्ही सर्वेक्षणास सुरूवात झाली असून या सर्वेक्षणासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना योग्य व परिपूर्ण माहिती देण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी  केले आहे.

    जिल्ह्याचे पालक सचिव एकनाथ डवले यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात या सर्वेक्षण मोहिमेचा शुभारंभ झाला. यावेळी, सह आयुक्त सरिता यादव, उप आयुक्त जयवंत आढाव, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, सांख्यिकी अधिकारी (निवृत्त) कुंदन कांबळे उपस्थित होते.

    सांख्यिकी आणि कार्यक्रम कार्यान्वयन मंत्रालय (MoSPI), भारत सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक बँकेच्या सहाय्याने आणि महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या MahaSTRIDE प्रकल्पांतर्गत ही सर्वेक्षणे करण्यात येत आहेत. या सर्वेक्षणातून प्राप्त होणाऱ्या आकडेवारीचा उपयोग शासनाच्या विविध विकासात्मक योजना, धोरणे आणि नियोजन प्रक्रियेसाठी केला जाणार आहे. PLFS सर्वेक्षणाद्वारे रोजगार व बेरोजगारीची स्थिती, महिला कामगारांचा सहभाग, स्वयंरोजगार आणि असंघटित रोजगार यासंदर्भातील अद्ययावत माहिती उपलब्ध होणार आहे. तर ASUSE सर्वेक्षणाद्वारे उत्पादन, व्यापार आणि सेवा क्षेत्रातील (बांधकाम क्षेत्र वगळून) असंघटित उद्योग आस्थापनांची संख्या, रोजगाराचे प्रकार, कार्यरत कामगारांची संख्या, उत्पादकता, वेतन आणि स्थूल मूल्यवर्धन (GVA) यांसारख्या महत्त्वपूर्ण आर्थिक निर्देशकांची माहिती संकलित केली जाणार आहे.

    सर्वेक्षणासाठी अर्थ व सांख्यिकी आयुक्तालयामार्फत नियुक्त करण्यात आलेल्या Ipsos Research Private Limited संस्थेचे प्रशिक्षित अन्वेषक व पर्यवेक्षक निवडक नमुना पद्धतीने निवडलेल्या कुटुंबे व उद्योगांना भेट देऊन माहिती संकलित करणार आहेत. संकलित करण्यात येणारी वैयक्तिक माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी  दिली.

    0000000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed