SRA Fraud Mumbai: मुंबईत मोठा SRA घोटाळा समोर आला आहे. ४७ जणांची तब्बल ५.५ कोटींची फसवणूक झाली. या प्रकरणात एका आमदाराच्या पीएचाही समावेश आहे.
चार ते पाच एजंटनी एसआरए अधिकाऱ्यांशी चांगली ओळख असल्याचे भासवून ४७ जणांकडून तब्बल साडेपाच कोटी उकळले. चार एजंटविरोधात निर्मलनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये एसआरएच्या एका निवृत्त अधिकाऱ्याचा समावेश आहे.
Pravin Darekar : देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्राला गरज, लोकं त्यांना दिल्लीला पाठवण्याची का घाई करत आहेत? प्रवीण दरेकर यांचा सवाल
घरांची खरेदी-विक्री करणाऱ्या एजन्सीच्या दिलेल्या तक्रारीनुसार, ही कारवाई करण्यात आली आहे. एजन्सीचे कार्यालय सांताक्रूझ येथे आहे. त्यांच्या कार्यालयात घरे खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणारा एक एजंट आला. त्याला एजन्सीचालकाने एसआरएतील घरांबाबत विचारणा केली. त्यावर एसआरएचे एजंट आणि निवृत्त अधिकारी राखीव घरे मिळवून देत असल्याचे त्याने सांगितले. त्याने एजन्सीचालकांची निवृत्त अधिकारी आणि एसआरए एजंटसोबत भेट घडवून आणली. एजंटनी परिसरानुसार घरांचे दर दिले.
एजन्सीचालकांनी ४७ ग्राहकांना माहिती दिली. काहींनी पूर्ण, तर काहींनी आगाऊ रक्कम एजन्सीकडे जमा केली. एजन्सीचालकांनी पाच कोटींपेक्षा अधिक रक्कम एजंटना दिली. एसआरएसाठी पुरावे, इतर कागदपत्रे या एजंट मंडळींनी दिली. मात्र घरांचा ताबा मिळत नसल्याने एजन्सी आणि ग्राहकांनी एसआरए कार्यालयात जाऊन चौकशी केली असता, ही कागदपत्रे बनावट असल्याचे दिसून आले, अशी माहिती पोलिसांनी दिली.
Health Scheme: धक्कादायक! खोटे रुग्ण आणि बनावट कागदपत्रे दाखवून ३ रुग्णालयांनी लाटले सरकारचे दोन कोटी रुपये
आमदाराच्या ‘पीए’चाही सहभाग
पैसे देऊनही घरे मिळत नसल्याचे पाहून सर्वांनी एजंटकडे पैसे परत मिळण्यासाठी तगादा लावला. त्यावेळी पश्चिम उपनगरातील एका आमदाराचा स्वीय सहायक आपले काम करून देणार असल्याचे एजंटनी सांगितले. त्यांनी या ‘पीए’ची भेटही घडवून आणली. ‘ पीए ‘ने घरे मिळवून देण्यासाठी २५ लाख रुपयांची मागणी केली. यातील काही रक्कम त्यांना देण्यात आली, मात्र त्यांनीही फसविल्याचा आरोप तक्रारीत आहे.
