Nashik Politics: महापालिकेतील या घटनेमुळे लोकप्रतिनिधी विरुद्ध प्रशासन असा वाद पुन्हा उफाळून आला आहे. या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी (दि. १५) महापालिका कर्मचारी संघटनेने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
नाशिक महापालिकेत मनुष्यबळाचा अभाव असून, एका-एका अधिकाऱ्याकडे दोन ते तीन विभागांचा पदभार आहे. त्यातच जनगणनेचे काम सुरू असल्याने महापालिकेचे कामकाज ठप्प झाले आहे. सिंहस्थाच्या कामांचा ताण, त्यात ‘म्हाडा’ प्रकरणामुळे आधीच अधिकारी तणावाखाली असताना सत्तारूढ भाजपच्या नगरसेवकांकडूनच अधिकाऱ्यांचा छळवाद केला जात असल्याचे समोर आले आहे. गेल्या महिन्यात टक्केवारीरून नगरसेवक आणि ठेकेदारांचा वाद थेट पोलिसांत पोहोचला होता. भाजपकडून ‘डॅमेज कंट्रोल’ केले गेले असतानाच भाजपच्या एका नगरसेवकाचा वादग्रस्त फाइलसाठीचा वाद शुक्रवारी हातघाईपर्यंत पोहोचला.
Nashik Crime: आदिवासी मुली विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; हरसूलमधील अल्पवयीन मुलीची अहिल्यानगरात विक्री, 10 जण ताब्यात
भाजपचे नगरसेवक सतीश निकम यांचे नगररचना विभागात एक प्रकरण गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. त्या प्रकरणावरून निकम आणि कनिष्ठ अभियंता प्रदीप भामरेंमध्ये चांगलाच वाद झाला. हा वाद हमरीतुमरीवर पोहोचला. त्यामुळे महापालिकेत एकच धावपळ उडाली. या प्रकारामुळे महापालिकेत लोकप्रतिनिधी विरुद्ध अधिकारी यांच्यातील संघर्ष पुन्हा उफाळून आला असून, हे प्रकरण पोलिसांत पोहोचण्याची शक्यता आहे.
.. अशी घडली घटना
नगरसेवक निकम यांनी शुक्रवारी दुपारी थेट नगररचना विभाग गाठून कामाचा आढावा घेण्यास सुरुवात केली. त्यांनी कनिष्ठ अभियंता भामरे यांच्याकडे वादग्रस्त फाइलबाबत विचारणा केली. परंतु, भामरे फोनवर बोलत असल्याचा राग येऊन निकम व भामरे यांच्यात शाब्दिक वाद सुरू झाली. संतापात निकम यांनी भामरेंचा फोन हिसकावून फेकून दिला. त्यानंतर हात उगारला, तसेच भामरेंना शिवीगाळ केल्याने नगररचना विभागात तणाव निर्माण झाला होता. या प्रकारानंतर पालिका वर्तुळात खळबळ उडाली. जवळपास दहा ते पंधरा मिनिटे दोघांमध्ये वाद सुरू होता. काही ज्येष्ठ नगरसेवकांनी धाव घेत दोघांमधील वाद मिटविल्याचे समजते.
Nashik News: नियमबाह्य उत्खनन; बारा खाणपट्ट्यांचे परवाने निलंबित, महसूल विभागाचा दणका
भामरेंचा थेट राजीनामा
संबंधित नगरसेवकाने शिवीगाळ आणि अरेरावीची भाषा करीत मारहाणीची धमकी दिल्याची तक्रार भामरेंनी आयुक्तांकडे केली आहे. या घटनेमुळे मानसिक तणावात गेलो असून, आपला स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज तातडीने मंजूर करावा, अशी मागणी भामरेंनी आयुक्त मनीषा खत्री यांच्याकडे केली आहे. या सर्व प्रकारामुळे पालिकेतील अधिकारी व कर्मचारी धास्तावले असून, स्वेच्छानिवृत्तीसाठी आता अधिकाऱ्यांची रांग लागण्याची शक्यता आहे.
धोंडे जेवण करुन फिरायला गेले अन् आक्रित घडलं; गंगापूर धरणात बुडून चार भावंडांचा करुण अंत, नाशिक हळहळलं!
महापालिकेत सोमवारी आंदोलन
अधिकारी व कर्मचाऱ्यांवर लोकप्रतिनिधींकडून येणाऱ्या दबावाविरोधात कर्मचारी संघटना आक्रमक झाल्या आहेत. येत्या सोमवारी कार्यालयीन वेळेत काळ्या फिती लावून आंदोलन करण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. या घटनेमुळे महापालिकेत काम करण्याची मानसिकता अधिकाऱ्यांमध्ये राहिली नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून फाइलचा पाठपुरावा करूनही उत्तर मिळत नव्हते. मी जनतेची कामे घेऊन गेलो होतो. लोकप्रतिनिधी या नात्याने काम होणे अपेक्षित होते. विचारणा करीत असताना संबंधित अभियंता मोबाइलवर बोलत होता, हा लोकप्रतिनिधींचा अपमान आहे. मी मारहाण केली नाही. – सतीश निकम, नगरसेवक, भाजप
