• Sun. Jun 14th, 2026

    संत मुक्ताबाई पालखी सोहळा नियोजन आढावा बैठक; वारकऱ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य; मूलभूत सुविधांचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश – केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jun 12, 2026
    संत मुक्ताबाई पालखी सोहळा नियोजन आढावा बैठक; वारकऱ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य; मूलभूत सुविधांचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश – केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव – महासंवाद

    बुलढाणा, दि. १२ (जिमाका) : श्री संत मुक्ताबाई यांच्या पावन पालखी सोहळ्याचे सुरक्षित, सुकर आणि शिस्तबद्ध आयोजन करण्यासाठी प्रशासनाने व्यापक नियोजन करावे, असे निर्देश केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण तसेच आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिले.

    जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पालखी सोहळ्याच्या पूर्वतयारी व नियोजन आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी डॉ. प्रविणकुमार देवरे, निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

    प्रतापराव जाधव यांनी सांगितले की, संत मुक्ताबाई पालखी सोहळा हा लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धा आणि भावनेशी निगडित असल्याने संपूर्ण पालखी मार्गावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा. विशेषतः महिला वारकऱ्यांची संख्या मोठी असल्याने त्यांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र महिला पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून आवश्यक मदत आणि मार्गदर्शन उपलब्ध करून द्यावे.

    पालखी मार्गावरील तसेच मुक्कामाच्या ठिकाणांवरील सुरक्षा व्यवस्थेबाबत कोणतीही तडजोड न करता पोलीस प्रशासनाने सतर्क राहावे, असेही त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय वारकऱ्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी मुक्कामस्थळी वीज, पिण्याचे पाणी, तात्पुरती स्वच्छतागृहे आणि इतर आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या.

    बैठकीत पालखी सोहळ्यादरम्यान वाहतूक व्यवस्थापन, आरोग्य सेवा, आपत्कालीन मदत आणि विविध विभागांमधील समन्वय याबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली. संत मुक्ताबाई पालखी सोहळा सुरक्षित, सुव्यवस्थित आणि भक्तिमय वातावरणात पार पडावा यासाठी प्रशासनाने सर्व आवश्यक तयारी पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.

    00000

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed