• Tue. Jun 16th, 2026

    ‘वसंत बहार’ मधून मराठी भावसंगीताची अनुभूती – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jun 11, 2026
    ‘वसंत बहार’ मधून मराठी भावसंगीताची अनुभूती – महासंवाद

    मुंबई, दि. ११ : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने ज्येष्ठ संगीतकार दिवंगत वसंत पवार यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित ‘वसंत बहार – मराठी भावसंगीतातील वसंत ऋतू’ या कार्यक्रमात शब्द सुरांच्या भावनिक अनुभूतेने श्रोते चांगलेच मंत्रमुग्ध झाले. विलेपार्ले येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात नुकताच हा कार्यक्रम झाला. मराठी भावसंगीताच्या सुवर्णकाळातील अजरामर गीतांनी सजलेल्या या कार्यक्रमाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मराठी चित्रपटसृष्टी आणि भावसंगीत क्षेत्रात आपल्या संगीताचा अमिट ठसा उमटविणारे ज्येष्ठ संगीतकार वसंत पवार यांच्या संगीत क्षेत्रातील बहुमोल योगदानाला आदरांजली अर्पण करण्यात आली. यासोबतच ज्येष्ठ संगीतकार वसंत प्रभू आणि वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेल्या लोकप्रिय व अजरामर गीतांचेही सादरीकरण करण्यात आले.

    ‘वसंत बहार’ या स्वरमैफिलीतून वसंत पवार, वसंत प्रभू आणि वसंत देसाई या तीन दिग्गज संगीतकारांच्या सांगीतिक वारशाचा वेध घेण्यात आला. मराठी भावसंगीतातील सुरेलता, भावस्पर्शी शब्द आणि समृद्ध संगीतपरंपरेचे दर्शन या कार्यक्रमातून घडले. कार्यक्रमातील प्रत्येक गीताला रसिकांनी भरभरून दाद दिली.

    मराठी संगीतविश्वाच्या समृद्ध परंपरेचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामुळे भावसंगीताच्या सुवर्णकाळातील सांगीतिक वैभवाचा अनुभव रसिकांना घेता आला. वसंत पवार, वसंत प्रभू आणि वसंत देसाई या तीन दिग्गज संगीतकारांच्या अजरामर संगीतसंपदेचा परिचय करून देत त्यांच्या कार्याला या कार्यक्रमातून अभिवादन करण्यात आले. मराठी भावसंगीतातील सुरेलता, भावस्पर्शी शब्द आणि संगीताची समृद्ध परंपरा यांचे प्रभावी दर्शन या कार्यक्रमातून घडले. गायिका केतकी भावे-जोशी, श्रद्धा वेटे तसेच गायक नचिकेत देसाई यांनी आपल्या सुमधुर गायनातून मराठी भावसंगीतातील अनेक गाजलेली गीते यावेळी सादर केली. कार्यक्रमाचे निवेदन अनघा मोडक यांनी केले, तर संगीत संयोजनाची धुरा प्रशांत लळित यांनी सांभाळली.

    000

    संजय ओरके/विसंअ

     

     

     

     

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed