• Fri. Jun 12th, 2026

    धुळे जिल्ह्याच्या सर्वसमावेशक विकासासाठी प्रयत्न करावेत – पालकमंत्री जयकुमार रावल – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jun 11, 2026
    धुळे जिल्ह्याच्या सर्वसमावेशक विकासासाठी प्रयत्न करावेत – पालकमंत्री जयकुमार रावल – महासंवाद

    धुळे, दि. ११ जून,२०२६ (जिमाका वृत्तसेवा) : आकांक्षित धुळे जिल्ह्यात जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून सर्वसमावेशक विकासासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी आज केले.

    पालकमंत्री श्री. रावल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन नियोजन सभागृहात जिल्हा वार्षिक योजनेची आढावा बैठक झाली. त्यावेळी पालकमंत्री श्री. रावल बोलत होते. यावेळी खासदार डॉ.शोभा बच्छाव, आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम पावरा, आमदार श्रीमती मंजुळा गावित, जिल्हा नियेाजन समितीच्या सदस्य सचिव तथा जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार, पोलीस अधीक्षक विशाल आनंद, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, अपर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर, निवासी उपजिल्हाधिकारी शरद पवार, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील सोनार, सहायक नियेाजन अधिकारी संतोष वानखेडे, एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त देविदास नांदगावकर यांच्यासह सर्व विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.

    पालकमंत्री श्री. रावल म्हणाले की, यंदाच्या जिल्हा वार्षिक योजनेतून मंजूर करण्यात आलेल्या निधीचा प्रभावी वापर करून विकास कामे वेळेत पूर्ण करावीत. नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन सर्व तालुक्यातील लोकप्रनिधीशी समन्वय साधून विकासकामांचे नियेाजन, योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि गुणवत्ता राखून विकास कामे पूर्ण करावीत. सर्व तालुक्यातील विकासकामे होतील यासाठी सर्व यंत्रणांनी नियोजनपूर्वक आणि समन्वयाने कामे करावे.

    शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य बाजारभाव मिळावा तसेच कृषी मालाचे स्थानिकस्तरावर मूल्यवर्धन व्हावे यासाठी जिल्ह्यात मिलेट, सोलर, कृषीवर आधारीत फूड  प्रोसेसिंग युनिट्स उभारण्यावर भर देण्यात यावा. जिल्हा वार्षिक योजनेतून राबविण्यात येणाऱ्या विविध विकास कामांचे भूमिपूजनासाठी लोकप्रतिनिधींना आमंत्रित करावे. जिल्ह्यात वन विभागाने वृक्ष लागवड करीत वनाच्छादान वाढवावे. जिल्ह्यातील बंधारे, प्रकल्प, धरणामधील गाळ काढण्यात यावा. नवीन शाळांचे बांधकाम करतांना स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी अशा मूलभूत सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात.

    प्रत्येक तालुक्यात वीज प्रतिबंधक यंत्रे बसविण्यात यावेत.पुनर्वसित गावांचे प्रश्न सोडविण्यासाठी नियमित आढावा घेण्यात यावा.  तालुकास्तरावर समन्वय समितीची बैठक घेण्यात यावी. संपूर्ण जिल्ह्यात वन पर्यटन विकास, इको टुरिझमचे कामे करावीत. सर्व शासकीय कार्यालये, शाळा,आश्रमशाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सौर संयंत्र बसविण्यात यावेत. असेही निर्देश पालकमंत्री श्री.रावल यांनी दिले. यावेळी खासदार डॉ. बच्छाव, आमदार श्री.पटेल , आमदार श्री.पावरा, आमदार श्रीमती गावित  यांनी विविध विषयांच्या चर्चेत सहभाग घेऊन विविध सूचना केल्या. जिल्हा नियोजन अधिकारी श्री. सोनार, आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी श्री. पवार, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त श्री. नांदगावकर यांनी सादरीकरण केले.

    या बैठकीत  22 जानेवारी, 2026 रोजी झालेल्या बैठकीच्या इतिवृत्तास मान्यता, जिल्हा वार्षिक योजना सन 2025-2026 मध्ये झालेल्या खर्चास मान्यता देणे, तसेच जिल्हा वार्षिक योजना मार्च, 2026 अखेर खर्चास मान्यता देण्यात देणे. जिल्हा वार्षिक योजना सन 2026-27 (सर्वसाधारण योजना, आदिवासी उपयोजना, अनुसूचित जाती उपयोजना) च्या खर्चाचे नियोजनावर चर्चा करण्यात आली.

    000000

     

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed