पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणांमध्ये मिळून सध्या अवघा पाच टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. पुढील तीन महिने पिण्याच्या पाण्याची गरज, आषाढी वारीसाठी लागणारे पाणी आणि शेतीसाठी आवश्यक आवर्तने यांचा विचार करता उपलब्ध साठ्याचे काटेकोर नियोजन करणे आवश्यक असल्याचे या वेळी महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी सर्वपक्षीय नेत्यांपुढे नमूद केले.
उपमहापौर परशुराम वाडेकर, सभागृह नेते गणेश बीडकर, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, विरोधी पक्षनेते नीलेश निकम, काँग्रेसचे गटनेते चंदू कदम, अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर; तसेच पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकुमार जगताप या बैठकीस उपस्थित होते.
काही भागांना दिलासा
‘ज्या भागांमध्ये आधीपासूनच कमी दाबाने किंवा एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे, त्या भागांवर अतिरिक्त कपात लादली जाणार नाही,’ असे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी स्पष्ट केले. त्यामध्ये हडपसर, काळेपडळ, कोल्हेवाडी, नांदोशी, महंमदवाडी, शिवाजीनगर परिसरातील काही भाग, भाग्योदयनगर, कोंढवा आणि धायरी या परिसरांचा समावेश आहे.
तीन महिन्यांची कसरत
यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज असल्याने चिंता वाढली आहे. धरणांमधील पाण्याचे बाष्पीभवन, वाढती लोकसंख्या आणि वाढलेली मागणी लक्षात घेता पुढील तीन महिने उपलब्ध जलसाठ्यावर तग धरण्याचे मोठे आव्हान महापालिकेसमोर आहे.
पाणी बचतीसाठी निर्बंध
-शहरातील सर्व वाहन धुलाई केंद्रे (वॉशिंग सेंटर) बंद करण्यात येणार.
-वाहने धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करण्यास बंदी.
-बांधकाम प्रकल्पांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर पूर्णतः बंद.
-बांधकामे आणि उद्यानांसाठी शुद्ध केलेले सांडपाणी (एसटीपी वॉटर) वापरणे बंधनकारक.
-व्यावसायिक, तसेच खासगी जलतरण तलावांवर निर्बंध.
-शहरातील विहिरी आणि कूपनलिकांचे सर्वेक्षण करून, पर्यायी जलस्रोतांचा वापर वाढविण्याचा निर्णय.
धरणांमधील पाणीसाठा
धरण –टीएमसी –टक्के
खडकवासला –०. ८४ –४२. ३३
पानशेत –२. २७ –२१. ३६
वरसगाव –१. ९० –१४. ८२
टेमघर –०. ०० –०. ०
एकूण –५. ०१ –१७. १९
उपलब्ध पाणीसाठ्याचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. पुणेकरांनी पाण्याचा जपून वापर करून प्रशासनाला सहकार्य करावे. पाणी कपातीबाबतचे नियोजन करण्यासाठी प्रशासनाला दोन दिवस देण्यात आले आहेत. परिस्थितीनुसार येत्या सोमवारपासून पाणीकपात करण्यात येईल. – मंजूषा नागपुरे, महापौर
मान्सूनचा प्रवास सोलापूरपर्यंत
अनुकूल वातावरणामुळे मान्सूनने सोमवारी रत्नागिरी जिल्ह्याचा आणखी काही भाग व्यापला. मध्य महाराष्ट्रातील सोलापूरपर्यंत प्रगती केली. पुढील दोन-तीन दिवसांत राज्याच्या आणखी काही भागांत मान्सूनची प्रगती होणार असल्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) व्यक्त केली. दरम्यान, पुणेकरांची अद्याप ऊन आणि उकाड्यापासून सुटका झालेली नाही, शहराला सध्या मान्सून पूर्व पावसाची प्रतीक्षा आहे. शहरात पुढील दोन दिवस दुपारनंतर आकाश ढगाळ राहील, असा अंदाज आहे.