• Thu. Jun 11th, 2026

    पुण्यात मेट्रो प्रवाशांना मिळणार ‘फर्स्ट-टू-लास्ट माईल कनेक्टीव्हीटी’, ऑटो फीडर सेवेमुळे प्रवास सोपा होणार

    पुण्यात मेट्रो प्रवाशांना मिळणार ‘फर्स्ट-टू-लास्ट माईल कनेक्टीव्हीटी’, ऑटो फीडर सेवेमुळे प्रवास सोपा होणार

    Metro-Auto Feeder Service: पुण्यातील मेट्रो स्थानकापर्यंत पोहोचणं सोपं करण्यासाठी ऑटो फीडर सेवा सुरू केली जाणार आहे. महा मेट्रोने महाराष्ट्र रिक्षा पंचायतसोबत ऑटो फीडर सेवेबाबत नुकताच करार केला.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    पुणे: शहरांत मेट्रोचा विस्तार होत असून प्रवाशांची संख्याही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मेट्रोमुळे वाहतूककोंडीपासून सुटका होत असली तर स्थानकांपर्यंत पोहोचताना आणि परतताना त्रास सहन करावा लागतो. शहरात सध्या केवळ दोन मेट्रो लाइन कार्यरत असून जुलैमध्ये तिसरीही होणार आहे. त्यामुळे प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेत महा मेट्रोने महाराष्ट्र रिक्षा पंचायतसोबत ऑटो फीडर सेवेबाबत करार केला आहे. यामुळे प्रवाशांना पुणे मेट्रोच्या स्थानकांपर्यंत पोहोचणं सोपं होणार आहे.

    प्रवाशांची संख्या वाढणार

    पुण्यात मेट्रो लाइन 1 पीसीएमसी ते स्वारगेट आणि वनाझ ते रामवाडी मेट्रो सुरू आहे. 15 जुलैला हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचा पहिला टप्पा देखील सुरू होणार आहे. या मार्गावर 12 स्थानकं असतील. उर्वरित मार्गिकाही येत्या 2-3 महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे. पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कमधील कर्मचाऱ्यांसाठी ही फायदेशीर ठरणार आहे. आयटी पार्कमधील कर्मचाऱ्यांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे मेट्रो मार्गावरील प्रवाशांची संख्या वाढणार आहे. यासह मेट्रो लाइन 1 आणि लाइन 2चा विस्तार सुरू होणार आहे.

    मेट्रो लाइन 1 चा स्वारगेट ते कात्रज असा विस्तार सुरू आहे. हा पुण्यातील पहिला भुयारी मेट्रो मार्ग असणार आहे. शिवाय मेट्रो लाइन 2चा रामवाडी ते चांदणी चौकपर्यंत विस्तार सुरू होणार आहे. दरम्यान, पुणे मेट्रो लाइन 2वरील डेक्कन जिमखाना आणि नारायण पेठ मेट्रो स्थानकापर्यंत कॉझवे बनवायचं काम सुरू आहे. त्यासाठी पुण्यातील भिडे पूल 9 जून पासून सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. वनाझ ते रामवाडी या मार्गिकेतील छत्रपती संभाजी उद्यान येथील पादचारी पूल बांधून तो प्रवाशांसाठी सुरू केला आहे. डेक्कन जिमखाना येथील स्थानकाचं काम गेल्या वर्षापासून सुरू आहे. या पादचारी पुलांमुळेही प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. पण गेल्या वर्षी या पुलाचं काम बंद केलं होतं. आता पावसाळा सुरू होण्यापूर्वी काम सुरू का केलं गेलं असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

    Maharashtra TimesPune News: पुण्यातील प्रकल्पांना मिळणार ‘सुपरस्पीड’! भुयारी बोगदे, बाह्य आणि अंतर्गत रिंग रोडसाठी ‘एसपीव्ही’ स्थापन करणार

    रॅपिडो सेवाही सुरू

    एप्रिल महिन्यातच महा मेट्रोने रॅपिडोसोबत फीडर ऑटो सेवा सुरू केली होती. ही सेवा सर्वप्रथम रामवाडी मेट्रो स्थानकापासून सुरू करून नंतर त्याचा हळूहळू विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता रिक्षा पंचायतसोबतही सेवा सुरू झाल्यामुळे प्रवाशांना फायदा होणार आहे.

    यावेळी पुणे मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्री.श्रावण हर्डीकर, मेट्रोचे महाव्यवस्थापत कॅप्टन डॉ. राजेंद्र सनेर-पाटील आणि महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. बाबा कांबळेंसह उपाध्याक्ष श्री. शुभम तांदळे आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा