Mumbai Metro Network: 2026 अखेरपर्यंत शहरातील मेट्रो नेटवर्क 120 किलोमीटर लांब होणार आहे. सध्या अनेक मार्गिकांचं काम सुरू असून यापूर्वीच दोन मार्ग सुरू झाले आहेत.
कोणत्या मार्गिका कार्यरत आहेत?
मुंबई मेट्रोच्या 14 प्रमुख मार्गिका आहेत. ब्लू लाइनवरील मुंबई मेट्रो लाइन 1 (वर्सोवा ते घाटकोपर) सर्वप्रथम 2014मध्ये सुरू झाली होती. त्यानंतर 8 वर्षांपर्यंत एकही नवीन मेट्रो लाइन सुरू नाही झाली. यावेळी अनेक मार्गांवरील मेट्रोचे प्रस्ताव मांडण्यात आले पण पहिल्या मार्गिकेच्या भूसंपादानात आणि बांधकामात अडथळे येऊ लागले. म्हणून मेट्रो लाइन 3 अॅक्वा लाइन पूर्णपणे भूमिगत बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. पण या मार्गिकेच्या बांधकामात वेळ आणि खर्चही मोठ्या प्रमाणा वाढल्यामुळे विलंब झाला. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यापुढील सर्व मार्गिका उन्नत असतील असा निर्णय घेतला.
त्यानंतर मुंबई मेट्रो 2चं बांधकाम 2016मध्ये सुरू झालं. यानंतर 2022मध्ये यलो लाइनवरील मुंबई मेट्रो 2ए (दहिसर पूर्व ते डहाणूकरवाडी) ही मार्गिका सुरू झाली. त्यानंतर रेड लाइनवरील दहिसर पूर्व ते आरेपर्यंत मेट्रो लाइन 7 सुरू झाली. त्यानंतर 2023मध्ये मेट्रो 2ए अंधेरी पूर्वेपर्यंत वाढवण्यात आली आणि लाइन 7 गुंदावलीपर्यंत. पश्चिम उपनगरातील पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि लिंक रोडवर या दोन्ही मार्गिका धावतात. यादरम्यान, एक नवीन पर्पल लाइन नवी मुंबईमध्ये सुरू झाली. नवी मुंबई मेट्रो लाइन 1 (बेलापूर ते पेंढार)चं काम 2023मध्ये पूर्ण झालं.
त्यानंतर शहरातील सर्वात महत्त्वाकांक्षी मार्गिकेचा पहिला टप्पा 2024मध्ये सुरू करण्यात आला. अॅक्वा लाइनच्या पहिल्या टप्प्यात आरे जेव्हिएलआर ते बीकेसी पर्यंत सुरूवात करण्यात आली. त्यानंतर ऑक्टोबर 2025मध्ये कफ परेडपर्यंत विस्तार करून अॅक्वा लाइन पूर्णपणे कार्यरत झाली. ही शहरातील सर्वात इंटरकनेक्टेड लाइन आहे. यानंतर 2026मध्ये दोन नव्या मार्गिका सुरू झाल्या. यलो लाइनवरील लाइन 2बी (अंधेरी पश्चिम ते मंडाले) मार्गिकेचा पहिला टप्पा (मंडाले ते डायमंड गार्डनर) सुरू झाला आहे. याशिवाय रेड लाइनचा मुंबईतच्या उत्तरेकडीही विस्तार झाला आहे. मेट्रो लाइन 9 (दहिसर ते मिरा भाईंदर) कार्यरत झाली असून उत्तरेकडील उपनगरांमधील लोकलवरील ताण कमी झाला आहे. या सर्व मार्गिका सध्या शहरात सुरू असून मुंबईत मेट्रो नेटवर्क 90 किलोमीटर लांब बनलं आहे.
2026मध्ये कोणत्या मार्गिका सुरू होतील ?
दरम्यान, ग्रीन लाइन नावाने एका नव्या मार्गिकेचं बांधकाम सुरू झाला. या मार्गावर लाइन 4 (वडाळा ते कासावडवली) 4ए (कासारवडवली ते गायमुख), मेट्रो लाइन 10 (गायमुख ते शिवाजी चौक) आणि लाइन 11 (वडाळ्यामार्गे वांद्रे कुर्ला संकुल ते गेट वे ऑफ इंडिया) या मार्गिकांचा समावेश आहे. यापैकी मेट्रो लाइन 4वरील पहिल्या टप्प्यातील बहुतांश काम पूर्ण झालं असून नोव्हेंबर महिन्यापर्यंत ही सुरू होण्याची शक्यता आहे. एका नव्या पिंक लाइनवर मेट्रो लाइन 6चं (लोखंडवाला ते जोगेश्वरी) बांधकाम सुरू असून 2026मध्ये ही सुरू होण्याची शक्यता आहे.
इतर प्रस्तावित मार्ग कोणते ?
ठाणे जिल्हा आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या ऑरेंज लाइनचा प्रस्तावही मांडण्यात आला आहे. मेट्रो लाइन 5 आणि 12 (ठाणे-भिवंडी-कल्याण-नवी मुंबई) या मार्गांचा समावेश आहे. याशिवाय तीन नव्या मार्गिकांचे प्रस्ताव सध्या सादर करण्यात आले आहेत. पहिली गोल्ड मेट्रो लाइन 8 (मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ), दुसरी पर्पल लाइन 13 (मिरा रोड ते विरार) आणि तिसरी शहरातील सर्वात लांब पल्ल्याची मजेंटा लाइन 14 (कांजूर मार्ग ते बदलापूर) या मार्गिकांचा समावेश आहे. या सर्व मार्गिका सुरू झाल्यावर मेट्रोचं जाळं 300 किलोमीटर लांब होणार आहे.
