• Sat. Sep 19th, 2026

Student News: दरवाजा उघडताच आईला धक्का, अंकिता हे काय करून बसली? १९ वर्षीय तरुणीच्या कृतीने कुटुंबाला धक्का

Student News: दरवाजा उघडताच आईला धक्का, अंकिता हे काय करून बसली? १९ वर्षीय तरुणीच्या कृतीने कुटुंबाला धक्का

अहिल्यानगर: कर्जत तालुक्यातील जलालपूर इथं नीट परीक्षेत अपेक्षित गुण न मिळाल्याच्या नैराश्यातून १९ वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली आली. अंकिता सुरेश सांगळे असं जीवन संपवलेल्या विद्यार्थिनीचे नाव असून तिने डॉक्टर होण्याचं स्वप्न डोळ्यांत साठवलं होतं, मात्र कट-ऑफपेक्षा ११ गुणांनी मागे पडल्याने आलेल्या मानसिक तणावातून तिने हा टोकाचा निर्णय घेतला आहे. या घटनेनं जलालपूरसह कर्जत तालुका शोकमग्न झाला असून परीक्षांच्या वाढत्या मानसिक तणावाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंकिता सांगळे हिने राहत्या घरातील स्वतंत्र अभ्यासिकेत गळफास घेऊन आत्महत्या केली. घटना घडली तेव्हा तिचे वडील आणि भाऊ पंढरपूर येथे दर्शनासाठी गेले होते, तर आई घरकामात व्यस्त होती. बराच वेळ मुलीकडून कोणतीही हालचाल न झाल्याने आईने अभ्यासिकेचा दरवाजा उघडला असता अंकिताने गळफास घेतल्याचे भीषण दृश्य समोर आले. त्यांच्या आरडाओरडीनंतर शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हनुमान गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. अंकिताचे काका अण्णा सांगळे यांनी दिलेल्या खबरीवरून कर्जत पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

“माझ्या मृत्यूसाठी कुणालाही जबाबदार धरू नका”

आत्महत्येपूर्वी अंकिताने लिहिलेल्या चिठ्ठीत तिने नीट परीक्षेत १६६ गुण मिळाल्याचा उल्लेख केला असून कट-ऑफ १७७ गुणांचा असल्याने डॉक्टर होण्याचे स्वप्न भंग झाल्याची वेदना व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, माझ्या आत्महत्येसाठी आई-वडील, भाऊ किंवा कुटुंबातील कोणालाही जबाबदार धरू नये, असं लिहिलं आहे.

फेरपरीक्षेने वाढला मानसिक ताण

फेरपरीक्षेत अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने अंकिता प्रचंड मानसिक तणावाखाली गेली होती. डॉक्टर होण्याच्या ध्येयासाठी सातत्याने मेहनत घेणाऱ्या अंकिताला अपयशाचा मोठा धक्का बसल्याचे नातेवाईकांनी सांगितले. अंकिताचे काका अण्णा सांगळे यांनी सांगितलं की, ती अत्यंत अभ्यासू होती. डॉक्टर होण्याचं तिचं स्वप्न होते. अवघ्या ११ गुणांनी ती कट-ऑफपासून मागे राहिली आणि त्याचाच तिला मोठा मानसिक धक्का बसला.

दरम्यान, पोलीस निरीक्षक हनुमान गायकवाड यांनी सांगितलं की, उपलब्ध माहितीनुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून सर्व बाबींचा सखोल तपास सुरू आहे.