• Mon. Jul 27th, 2026
    Rain Alert: राज्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसणार; ५ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, हवामान विभागाचा ताजा अंदाज

    मुंबई: राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मागील काही दिवसांपासून संततधार पावसाने हजेरी लावलेली असताना हवामान विभागाकडून पुन्हा एकदा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबई वेधशाळेने राज्यातील पुढील पाच दिवसांच्या हवामानाचा अंदाज जाहीर केला असून, अनेक जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसंच काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

    हवामान विभागाच्या अलर्टनुसार, २७ जुलै रोजी रायगड, रत्नागिरी , कोल्हापूर जिल्ह्यातील घाट परिसर, सातारा जिल्ह्यातील घाट परिसर आणि पुणे जिल्ह्यातील घाट परिसरात ऑरेंज अलर्ट दिला असून काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे आहे. तर ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, नांदेड, हिंगोली, लातूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला असून वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटाची शक्यता आहे.

    २८ जुलै रोजी चंद्रपूर, गडचिरोली, रायगड, जळगाव, पुणे घाट परिसर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. २९ जुलै रोजी गोंदिया चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर नाशिक, नाशिक घाट परिसर, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, कोल्हापूर घाट, रत्नागिरी, सातारा घाट, रायगड, पुणे घाट आणि सिंधुदुर्ग या भागात वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

    ३० जुलै रोजी रायगड, पुणे घाट, सातारा घाट, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

    दरम्यान, विजांच्या कडकडाटाच्या वेळी नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी राहावे, झाडाखाली उभे राहणे टाळावे तसेच शेतकरी व नागरिकांनी स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असं आवाहन हवामान विभागानं केलं आहे.