Pune Gas Cylinder Leakage Blast : गॅसगळती झाल्याचे लक्षात येताच घर वाचवण्यासाठी सिलिंडर बाहेर काढण्याचा प्रयत्न गित्ते कुटुंबीयांनी केला. सिलिंडर गॅलरीतून बाहेर फेकण्याच्या उद्देशाने त्यांनी तो किचनमधून हॉलमध्ये आणला, परंतु देवघरातील पेटत्या दिव्यामुळे काही क्षणांतच भीषण स्फोट झाला.
विष्णू मुंजाजी गित्ते (वय ८०), वृंदाविनी विष्णू गित्ते (वय ६०) आणि पांडुरंग विष्णू गित्ते (वय ३५, सर्व रा. खांदवेनगर) अशी स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. पांडुरंग यांची पत्नी राजश्री (वय ३२ ) आणि मुलगी निहारिका (वय सहा) किरकोळ जखमी झाल्या आहेत. पांडुरंग एका आयटी कंपनीत अभियंता होते.
गॅस गळती होऊन स्फोट
शुक्रवारी सकाळी स्वयंपाकघरातील गॅस सिलिंडर संपल्याने वृंदाविनी गित्ते भरलेला सिलिंडर जोडत असताना गॅस गळती झाली. पांडुरंग आणि विष्णू गित्तेही तिथेच होते. रेग्युलेटरमधून गॅस गळती होऊन स्फोट झाला. त्यात तिघेही गंभीररीत्या भाजले. शेजाऱ्यांनी तातडीने अग्निशमन दल आणि पोलिसांना बोलावले. खराडी, धानोरी, येरवडा आणि ‘पीएमआरडीए’च्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली.
आधी मुलगा, मग वडील, अखेर आईचाही मृत्यू
ससून रुग्णालयात उपचार सुरू असताना दुपारी बाराच्या सुमारास पांडुरंग गित्ते यांचा मृत्यू झाला. दुपारी तीन वाजता विष्णू गित्ते आणि साडेपाचला वृंदाविनी गित्ते यांचा मृत्यू झाला. आई-वडील आणि मुलाचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. खराडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्रीपर्यंत सुरू होते.
Delhi Fire : माझं कर्तव्य होतं ते! हॉटेलात आग, व्यापाऱ्याने लोकांच्या सुटकेसाठी गाद्या पसरल्या, दोन लाखांचं नुकसान, पण 8 जीव वाचले!
घराचे मोठे नुकसान
स्फोटामुळे किचन, स्वच्छतागृह, शौचालय, हॉलमधील गीझर, खिडक्या, दारे, फर्निचर जळून खाक झाले. आगीमुळे घरातील फरशा तुटून उखडल्या होत्या. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाल्याने बचावकार्यात अडथळे येत होते. अग्निशामक अधिकारी प्रमोद सोनवणे, दत्तात्रय सातव आदींच्या पथकाने आग आटोक्यात आणली.
सुनेत्रा पवारांची जागा नवनीत राणा यांना मिळणार? राज्यसभेबाबत सुनील तटकरेंचं उत्तर
घर वाचवण्याच्या प्रयत्नात कुटुंब उद्ध्वस्त
गॅसगळती झाल्याचे लक्षात येताच घर आणि कुटुंब वाचवण्यासाठी सिलिंडर बाहेर काढण्याचा प्रयत्न गित्ते कुटुंबीयांनी केला. सिलिंडर गॅलरीतून बाहेर फेकण्याच्या उद्देशाने त्यांनी किचनमधून हॉलमध्ये आणला अन् तेथील देवघरातील पेटत्या दिव्यामुळे काही क्षणांतच भीषण स्फोट झाला.
देवघरातील पेटत्या दिव्याने स्फोट
खराडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, गॅसगळती झाल्याचे लक्षात आल्यानंतर गित्ते कुटुंबीयांनी सिलिंडर सुरक्षित ठिकाणी नेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सिलिंडर स्वयंपाकघरातून उचलून हॉलमध्ये आणला होता. गॅलरीतून तो खाली फेकण्याचा त्यांचा विचार होता. मात्र, हॉलमधील देवघरात दिवा पेटता होता. तोपर्यंत घरभर गॅस पसरल्याने दिव्याच्या ज्योतीचा संपर्क येताच गॅसने पेट घेतला आणि सिलिंडरचा भीषण स्फोट झाला.
Kolhapur Accident : मुंबईकर कुटुंबाने कोल्हापुरात घर बांधलं, सुट्टीत गावी मुक्काम, टेम्पोखाली चिरडून चौघांचा मृत्यू, वृद्ध आजीवर वाईट वेळ
या दुर्घटनेतून बचावलेल्या राजश्री गित्ते यांचा जबाब पोलिसांनी नोंदवला आहे. घटनेवेळी त्या अंघोळ करीत होत्या. स्वयंपाकघरातून आरडाओरडा ऐकू आल्याने त्यांनी दरवाजा उघडून पाहिले असता गॅसगळती झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. मात्र, त्या बाहेर येण्यापूर्वीच स्फोट झाला.
