Toll Waiver:गणेशोत्सवाला अवघे मोजके दिवस बाकी असताना गावी जाणाऱ्या प्रत्येकाची लगबग सुरू झाली आहे. अशातच राज्यसरकारकडून दरवर्षी गणेशभक्तांना टोलमाफी देण्यात येते परंतु अजून त्याची घोषणा झालेली नसल्याने पासवाटप लवकर सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
त्यामुळे अनेक सर्वसामान्य गणेशभक्त या सवलतीपासून वंचित राहतात. टोलमाफीचा लाभ सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी निर्णय लवकर जाहीर करावा आणि जनजागृती करावी, अशी मागणी प्रवासी संघटनांकडून होत आहे.
टोलमाफीचे पास
गणेशोत्सवासाठी मुंबई, नवी मुंबई, पनवेल, ठाणे आणि परिसरातून मोठ्या संख्येने चाकरमानी राज्याच्या विविध भागांत, विशेषतः कोकणात गावी जात असतात. खासगी वाहनांनी गावी जाणाऱ्या गणेशभक्तांना राज्य सरकारकडून मागील काही वर्षांपासून टोलमाफी दिली जाते. त्यासाठी वाहतूक शाखा, आरटीओ कार्यालय, पोलिस ठाणे आदी ठिकाणी आवश्यक कागदपत्रे सादर केल्यानंतर टोलमाफीचे पास दिले जातात.
किमान आठ दिवस आधी पासवाटप करा
मात्र, पास मिळवण्यासाठी संबंधित कार्यालयात प्रत्यक्ष जावे लागते. त्यातच पासवाटपाची माहिती अनेक नागरिकांपर्यंत वेळेत पोहोचत नाही. त्यामुळे टोलमाफीचा निर्णय आणि पासवाटप गणेशोत्सवाच्या तोंडावर तीन-चार दिवस आधी सुरू करण्याऐवजी किमान आठ दिवस आधी सुरू करावे, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
फास्टॅग कपातीमुळे वाद
टोलमाफीचा पास असतानाही वाहन टोलनाक्यावर गेल्यावर फास्टॅगमधून पैसे आपोआप कपात होतात, अशी तक्रार वाहनचालकांकडून केली जाते. त्यामुळे टोल सवलतीचा प्रत्यक्ष लाभ मिळत नाही. मागील अनेक वर्षांपासून मुंबई-पुणे महामार्गावर या कारणावरून टोल कर्मचारी आणि वाहनचालकांमध्ये वाद होत असल्याचे प्रवासी संघटनांचे म्हणणे आहे.
प्रवासी संघटनांची मागणी
टोलमाफीचा निर्णय लवकर जाहीर करून पासवाटप किमान आठ दिवस आधी सुरू करावे, तसेच फास्टॅगमधून आपोआप होणाऱ्या कपातीबाबत स्पष्ट उपाययोजना करावी, अशी मागणी प्रवासी संघटना करीत आहेत.
Kasara News: कसारा फास्ट लोकल दिवसभरात अवघ्या ११; मध्य रेल्वे मार्गावर प्रवाशांचे हाल
पासवाटप आठ दिवस आधी सुरू करा
यंदा मुंबई-गोवा महामार्गावर टोल सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे पासवाटपाची सुविधा किमान आठ दिवस आधी सुरू करायला हवी. गावाला जाण्याची तयारी सुरू असताना रहिवाशांना पाससाठी धावपळ करावी लागते. त्यामुळे एक आठवडा आधीपासून पासवाटप सुरू करणे आवश्यक आहे, असे सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघ, पनवेलचे अध्यक्ष केशव राणे यांनी सांगितले.
