• Sun. Jun 14th, 2026
    गर्भलिंग निदानासाठी ‘मोबाइल ॲप’चा वापर, पोर्टेबल सोनोग्राफी मशिनला WiFi ने जोडणी, पुण्यातील प्रकार

    Mobile App for Gender Determination : आगामी काळात गर्भलिंग निदान तपासणीला आळा बसवा आणि तातडीने माहिती मिळावी, यासाठी ‘खबऱ्यां’चा सहभाग वाढण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. प्रतिनिधी, पुणे : गर्भलिंग निदान करणाऱ्यांसाठी आता पोर्टेबल सोनोग्राफी मशिन बरोबरच ‘मोबाइल ॲप’चा वापर करण्यात येत असल्याचे पुन्हा एकदा उघडकीस आले आहे. मार्च महिन्यात शिरूर तालुक्यात हा प्रकार उघडकीस आला होता. आता यवत येथील कारवाईतही पोर्टेबल सोनोग्राफी मशिन आणि मोबाइल ॲपचा वापर झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, दौंड तालुक्यातील सर्व सोनोग्राफी सेंटर, खासगी हॉस्पिटल, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि गर्भपात केंद्रांची (एमटीपी सेंटर) तपासणी आरोग्य विभागाने सुरू केली असून, तपासणीचा अहवाल दोन दिवसांत सादर करण्याचा आदेश दिला आहे.

    ‘मोबाइल ॲप’चा वापर

    गर्भलिंग निदान प्रकरणी शिरूर तालुक्यात डोकसांगवी येथे मार्च महिन्यात कारवाई करण्यात आली होती. या कारवाईत ‘मोबाइल ॲप’चा वापर केल्याचे स्पष्ट झाले होते. आता यवत प्रकरणातही ‘मोबाइल ॲप’चा वापर झाल्याची माहिती आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. प्रोब मशिनला ‘वायफाय’द्वारे संबंधित मोबाइल ॲप जोडले जाते. त्यानंतर मोबाइलद्वारे सोनोग्राफी करण्यात येत असल्याचे समोर आले आहे.
    Maharashtra TimesKolhapur Accident : मुंबईकर कुटुंबाने कोल्हापुरात घर बांधलं, सुट्टीत गावी मुक्काम, टेम्पोखाली चिरडून चौघांचा मृत्यू, वृद्ध आजीवर वाईट वेळ

    बंदीबाबत राज्य सरकारला पत्र

    शिरूर तालुक्यातील घटनेनंतरच या ॲपवर बंदी घालावी, असे पत्र पुणे जिल्हा शल्यचिकित्सकांनी राज्य सरकारला पाठवले होते, असे स्पष्टीकरण आरोग्य विभागाने दिले आहे. दौंड तालुक्यासह सर्व तालुक्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचा आदेश देण्यात येणार आहे.

    आरोग्य विभागाला माहिती मिळेना

    कोणत्या भागात आणि रुग्णालयात गर्भलिंग निदान सुरू आहे, याची माहिती आरोग्य विभागला मिळत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे आगामी काळात गर्भलिंग निदान तपासणीला आळा बसवा आणि तातडीने माहिती मिळावी, यासाठी ‘खबऱ्यां’चा सहभाग वाढण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

    सुनेत्रा पवारांची जागा नवनीत राणा यांना मिळणार? राज्यसभेबाबत सुनील तटकरेंचं उत्तर

    पाच जिल्ह्यांवर लक्ष

    गेल्या काही वर्षांतील कारवाईतून चार ते पाच जिल्ह्यांमध्ये गर्भलिंग निदान तपासणी होत असल्याचे उघडकीस आले आहे. पोलिस प्रशासन, आरोग्य विभाग आणि सबंधित विभागाची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत पुणे, अहिल्यानगर, धाराशिव, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये या प्रकारच्या घटना घडत असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे या जिल्ह्यांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
    Maharashtra TimesMumbai Watermelon Deaths : ना चमचे-प्लेट, ना बिर्याणी, ना उंदीरनाशक; कशातही झिंक फॉस्फाईड नाही, डोकाडिया मृत्यू प्रकरणी पोलिसांसमोर चार नवे अँगल
    दौंड तालुक्यातील सर्व रुग्णालये आणि सोनोग्राफी सेंटरची तपासणी करण्याचा आदेश दिला आहे. तपासणीसाठी पाच पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे; तसेच अहवाल देण्यासाठी स्वतंत्र पथक नियुक्त केले आहे. या अॅप बंदी घालण्यासाठी मार्च महिन्यात पत्र दिले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ यम्पल्ले यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ला दिली.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा