• Fri. Jun 5th, 2026

    परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर धडक कारवाई; १.९ कोटींचा मुद्देमाल जप्त – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jun 5, 2026
    परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर धडक कारवाई; १.९ कोटींचा मुद्देमाल जप्त – महासंवाद

    मुंबई, दि. ५ : पुणे शहरात नुकतीच घडलेली विषारी दारू दुर्घटना लक्षात घेता, राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध आणि बनावट मद्याच्या विरोधात धडक कारवाई सुरु केली आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून ठाणे जिल्ह्यात एका मोठ्या कारवाईत तब्बल १ कोटी ८९ लाख ६६ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

    राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख आणि सह-आयुक्त (अं. व द.) प्रसाद सुर्वे यांच्या मार्गदर्शनानुसार, कोकण विभागाचे उपआयुक्त प्रदीप पवार यांनी संपूर्ण परिसरात परराज्यातील व बेकायदेशीर मद्य वाहतुकीविरोधात विशेष मोहीम उघडली आहे. पनवेल-मुंब्रा हायवेवरील दहिसर मोरी परिसरातून परराज्यातील अवैध मद्याची मोठी खेप नेली जाणार असल्याची खात्रीलायक माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक दिगंबर शेवाळे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने तातडीने हालचाली करत दहीसर मोरी येथील ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसमोर सापळा रचला. आणि काही वेळातच संशयित चॉकलेटी आणि पांढऱ्या रंगाचा सहाचाकी आयशर ट्रक (क्र. जीजे-२३-एवाय-१७१८) अडवून चालकाकडे चौकशी केली असता, त्याने ट्रकमध्ये वाहनांचे सुटे भाग भरलेले असल्याचे सांगून अधिकाऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पक्की माहिती असल्याने पथकाने ट्रकची ताडपत्री काढून कसून तपासणी केली.

    तेव्हा अधिकाऱ्यांना खाकी रंगाचे शेकडो बॉक्स आढळून आले. हे बॉक्स उघडले असता त्यात गोवा राज्यात निर्मिती झालेल्या ‘रॉयल ब्ल्यू माल्ट व्हिस्की’ या ब्रँडच्या १८० मिली क्षमतेच्या बाटल्यांचा साठा सापडला. विशेष म्हणजे या बाटल्यांवर कोणत्याही प्रकारचा बॅच नंबर अथवा कमाल विक्री किंमत  छापलेली नव्हती. महाराष्ट्र राज्यात या मद्याच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी आहे. पोलिसांनी ट्रकमधून एकूण १५३० बॉक्स जप्त केले, ज्यामध्ये ७३,४४० दारूच्या बाटल्या होत्या.

    या प्रकरणी ट्रक चालक प्रविण किशनलाल कुमार याला अटक केली. या कारवाईत आयशर ट्रक, ७३ हजारहून अधिक दारूच्या बाटल्या आणि एक मोबाईल फोन असा एकूण १,८९,६६,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. प्रवीण कुमार विरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.

    राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या या यशस्वी कामगिरीत निरीक्षक दिगंबर शेवाळे यांच्यासह दुय्यम निरीक्षक रिंकेश दांगट, दुय्यम निरीक्षक एच. बी. यादव, सहाय्यक दुय्यम निरीक्षक महावीर कोळेकर आणि जवान कुणाल तडवी, अमित सानप, हनुमंत गाढवे व सागर चौधरी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

    माहिती देणाऱ्यांचे नाव गोपनीय राहणार

    आपल्या परिसरात कुठेही बनावट दारू, परराज्यातील बेकायदेशीर मद्य, अवैध मद्य निर्मिती किंवा विक्री होत असल्यास, अथवा मिथेनॉल आणि क्लोरेल हायड्रेट सारख्या मानवी जीवाला घातक असणाऱ्या रसायनांची निर्मिती, भेसळ किंवा वाहतूक होत असल्यास नागरिकांनी तातडीने प्रशासनाला टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९९,  व्हॉट्सॲप क्रमांक ८४२२००११३३ वर माहिती द्यावी, असे आवाहन उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने करण्यात आले आहे; तसेच माहिती देणाऱ्या नागरिकांचे नाव आणि ओळख संपूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

    0000

    निलेश तायडे/विसंअ

     

     

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed