काकडे यांनी जय अजित पवार यांना १० कोटी रुपयांचे कर्ज दिल्यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध करण्यात आले. त्याबाबत विक्रम काकडे यांच्याकडे माध्यमांनी विचारणा केली. त्याबाबत त्यांनी भूमिका स्पष्ट केली. ‘मी जय पवार यांना १० कोटी रुपयांचे कर्ज दिल्याच्या बातम्या सकाळपासून पाहत आहे. मात्र, प्रत्यक्षात ते कर्ज नाही. भूखंडासाठीची दिलेली आगाऊ रक्कम आहे. प्रतिज्ञापत्रात एक स्वतंत्र कॉलम आहे. त्यामध्ये कर्ज किंवा आगाऊ रक्कम दिल्याचा उल्लेख करावा लागतो. त्यानुसार त्यामध्ये मी दिलेल्या रकमेचा आगाऊ किंवा कर्ज या वर्गवारीच्या प्रकारात उल्लेख केला आहे. मी जय पवार यांना कर्ज दिले नाही,’ असेही काकडेंनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे उमेदवार विक्रम संजय काकडे यांनी ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. दुसऱ्याच क्षणी त्यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळाली. उमेदवारी अर्ज दाखल करताना काकडे यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले. त्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी संपत्ती दीडशे कोटींहून अधिक असल्याचे म्हटले आहे.
…अखेर काकडे बिनविरोध
पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत अखेर अपेक्षेप्रमाणे महायुतीचे उमेदवार विक्रम काकडे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे उमेदवार व शहराध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी गुरुवारी दुपारी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर निवडणुकीतील सर्वच राजकीय समीकरणांवर पडदा पडला. मात्र, या माघारीमागे झालेल्या पडद्यामागील हालचाली आणि ‘सिल्व्हर ओक’पर्यंत पोहोचलेली राजकीय मध्यस्थी याचीच अधिक चर्चा राजकीय वर्तुळात रंगली.
माजी खासदार संजय काकडे यांनी थेट ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी संपर्क साधून आपल्या पुत्रासाठी म्हणजेच विक्रम काकडे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा करून देण्याची विनंती केल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले. स्थानिक राजकीय गणिते आणि जुने राजकीय संबंध लक्षात घेऊन शरद पवार यांनीही या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद दिल्याची चर्चा आहे.
‘जिजाई’ ते ‘सिल्व्हर ओक’
महायुतीकडून पुण्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) मिळणार हे स्पष्ट झाल्यानंतर उमेदवारीसाठी अनेक इच्छुकांनी प्रयत्न सुरू केले होते. मात्र, खासदार पार्थ पवार यांनी आपले निकटवर्तीय मित्र विक्रम काकडे यांच्या नावाला पाठबळ दिल्याने त्यांचे पारडे जड झाले. या निर्णयानंतर पक्षातील अनेक निष्ठावंत नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यात शहराध्यक्ष आणि माजी आमदार सुनील टिंगरे यांचे नाव आघाडीवर होते. पक्षातील असंतोष नियंत्रित करण्यासाठी टिंगरे यांचाही अर्ज दाखल करण्यात आला. मात्र, विक्रम काकडे यांनी स्वत: टिंगरे यांची भेट घेऊन अर्ज मागे घेण्याची विनंती केली होती. पक्षादेश मान्य करीत टिंगरे यांनीही माघार घेतली.
‘त्या’ आठवणी पुन्हा चर्चेत
श्रीकांत पाटील यांच्या माघारीनंतर राजकीय वर्तुळात आणखी एका चर्चेला उधाण आले. २०१२ मधील राज्यसभा निवडणुकीत संजय काकडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना मदत करण्यासाठी घेतलेली भूमिका आणि त्या वेळी दाखविलेली राजकीय साथ याची परतफेड या वेळी झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे ही निवडणूक केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची राहिली नसून जुने राजकीय संबंध आणि परस्पर विश्वास यांचाही भाग ठरल्याचे निरीक्षकांचे मत आहे.
अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी महायुतीने आखलेल्या रणनीतीनुसार भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद, शिवसेनेचे रणजित जरे आणि सुनील टिंगरे यांनी आपले अर्ज मागे घेतले. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) तुषार कामठे यांनीही अर्ज दाखल केला होता. मात्र, श्रीकांत पाटील यांच्यासह त्यांचाही अर्ज मागे घेण्यात आल्याने निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग प्रशस्त झाला.