Anantrao Thopate: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचं वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झालं आहे. आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत ते काँग्रेसशी एकनिष्ठ राहिले.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री अनंतराव थोपटे यांनी वयाच्या ९३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. शेवटच्या श्वासापर्यंत ते काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिले. त्यांचे सुपुत्र संग्राम थोपटे यांनी काही महिन्यांपूर्वीच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. पण अनंतराव थोपटे अखेरपर्यंत काँग्रेसी राहिले.
राजकीय कारकिर्दीत अनेक वर्षे मंत्रिपदी राहिलेल्या, सहावेळा आमदार झालेल्या अनंतराव थोपटे यांच्यावर गेल्या १५ दिवसांपासून पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात उपचार सुरू होते. गुरुवारी संध्याकाळी सातच्या सुमारास त्यांनी जगाचा निरोप घेतला. शुक्रवारी सकाळी भोर येथील निवासस्थानी त्यांच्यावर अंत्यविधी होतील. भोर मतदारसंघ आणि थोपटे कुटुंब यांचं नातं गेली अनेक दशकं अगदी घट्ट राहिलं. १९७२ ते २०२४ या पाच दशकांचा विचार केल्यास, ७ वर्षांचा अपवाद सोडल्यास थोपटे कुटुंबियांनी भोरचं प्रतिनिधीत्व केलं. या मतदारसंघातून अनंतराव थोपटे सहावेळा निवडून गेले.
अनंतराव थोपटे यांचा समावेश काँग्रेसच्या जुन्याजाणत्या नेत्यांमध्ये होतो. पुणे जिल्ह्यात काँग्रेस रुजवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. मंत्रिमंडळात त्यांनी महत्त्वाची खाती सांभाळली. १९७२ मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. तेव्हा ते अपक्ष निवडून आले. १९८० मध्ये ते दुसऱ्यांदा आमदार झाले. या टर्ममध्ये त्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली. दुग्धविकास, पशुसंवर्धन, उच्च व तंत्रशिक्षण, परिवहन, पुनर्वसन, रोजगार हमी योजना, मत्स्यव्यवसाय, फलोत्पादन, संसदीय कार्य, विधिमंडळ कामकाज या खात्यांचा कारभार त्यांनी सक्षमपणे हाताळला.
अनंतराव थोपटे यांचं नाव कधीकाळी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत होतं. १९९९ मध्ये शरद पवारांनी काँग्रेसमधून बाहेर पडत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. पुण्यावर शरद पवारांचं वर्चस्व होतं. पण थोपटे यांनी त्यांच्या सोबत न जाता काँग्रेसशी एकनिष्ठ राहण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ भोरमधूनच फोडला होता. यावरुन थोपटे यांच्या राजकीय ताकदीची कल्पना यावी.
१९९९ मध्ये काँग्रेसला बहुमत मिळाल्यास, पक्षानं सर्वाधिक जागा जिंकल्यास थोपटे मुख्यमंत्री होतील, अशी चर्चा होती. सलग चार निवडणुका जिंकणाऱ्या थोपटे यांचा त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काशिनाथ खुटवड यांनी पराभव केला. हा थोपटे यांच्यासाठी मोठा धक्का होता. या निवडणुकीनंतर राज्यात काँग्रेसचं सरकार आलं. पण त्यात थोपटे नव्हते. २००४ मध्ये त्यांनी पुन्हा निवडणूक लढवली आणि विजयी झाले. यानंतर २००९, २०१४ आणि २०१९ मध्ये त्यांचे पुत्र संग्राम थोपटे यांनी भोरचं प्रतिनिधीत्व विधानसभेत केलं.
लेखकाबद्दलकुणाल गवाणकरकुणाल गवाणकर हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. मे २०२२ पासून ते मटा ऑनलाईनमध्ये काम करत आहेत. प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल अशा तिन्ही माध्यमांचा एकत्रित १४ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचं लेखन करण्याचा अनुभव आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि त्यासंदर्भातील बातम्या यावरही त्यांचा हातखंडा आहे.
पत्रकारितेतील अनुभव बीएमएमचं शिक्षण घेत असताना सकाळ वृत्तपत्रातून त्यांनी बातमीदारीला सुरुवात केली. वयाच्या १९ व्या वर्षी ते सकाळमध्ये अंशकालीन बातमीदार म्हणून रुजू झाले. शहरातील मुलभूत समस्या, लोकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या अडचणी यावर त्यांनी वृत्तांकन केलं. त्यांनी केलेल्या बातम्यांमुळे काही समस्या सुटण्यास मदत झाली. मुंबईच्या दहिसर येथील गोदावरी ही मराठी माध्यमाची शाळा बंद होणार होती. त्यामुळे गरीब घरातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. हा प्रश्न त्यांनी बातमीच्या माध्यमातून मांडला. त्यामुळे ही शाळा वाचली. त्याबद्दल तिथल्या शिक्षकांनी ‘सकाळ’चं कौतुक केलं होतं.
मालाडमधील एका खासगी संस्थेला दहिसरमध्ये नाममात्र दरात रुग्णालयासाठी दिलेली जागा, तिथे त्यांनी नियम मोडून खासगी वापरासाठी, श्रीमंत रुग्णांसाठी केलेली व्यवस्था, त्या रुग्णालयाचं दोन आमदारांनी केलेलं उद्घाटन, या सगळ्याबद्दल सखोल माहिती देणारी वृत्तमालिका विशेष गाजली. आमदारांनी सार्वजनिक निधीचा खासगी इमारतींमध्ये केलेला वापर, नियम धाब्यावर बसवून केलेली कामं या बातम्यांचीदेखील विशेष चर्चा झाली. जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलं.
‘जय महाराष्ट्र’ च्या माध्यमातून २०१३ मध्ये टीव्ही मीडियात पाऊल टाकलं. सुरुवातीला फास्ट न्यूजच्या बुलेटिनची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर जनरल बुलेटिन प्रोड्युसर म्हणून काम केलं. ‘मोहीम’ या प्राईम टाईममधील विशेष कार्यक्रमासाठी प्रोड्युसर म्हणून काम पाहिलं, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित कार्यक्रमांचं संकलन केलं.
टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीत स्पेशल पॅकेज लिहिण्याची जबाबदारी पार पडली. स्पेशल रिपोर्ट या प्राईम टाईम शोचा प्रोड्युसर म्हणून काम केलं. एकाच विषयाचे विविध पैलू प्रेक्षकांना उलगडून सांगण्याचं कौशल्य या शोमधून त्यांनी आत्मसात केलं.
लोकसत्ताच्या माध्यमातून त्यांनी २०१६ मध्ये ‘डिजिटल’ क्षेत्रात पदार्पण केलं. महाराष्ट्र, देश आणि आंतरराष्ट्रीय बातम्या करण्याची जबाबदारी त्यांना मिळाली. मुंबईसह महत्त्वाच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, त्यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांनी इथे मिळाली. डिजिटल माध्यमात पहिल्यांदाच न्यूजरुम बुलेटिनचा प्रयोग झाला. त्यात त्यांनी अनेकदा सूत्रसंचालनाची भूमिका बजावली. २०१७ मध्ये ‘लव्ह डायरीज’ नावाची प्रेमकथांना समर्पित असलेली मालिका सुरु करण्यात आली. त्यातील अनेक कथा त्यांनी लिहिल्या होत्या. या मालिकेतील बऱ्याचशा कथांचं कौतुक झालं.
लोकमत डिजिटलमध्ये त्यांनी २०१८ ते २०२२ अशी चार वर्षे काम केलं. लोकसभा, विधानसभा निवडणूक, प्रचारसभा, निकाल यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांना मिळाली. पाच राज्यांच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, निकालांचं विश्लेषण करण्याची, घडामोडींचे विविध कंगोरे उलगडून वाचकांपुढे ठेवण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. जोक सेक्शनपासून ते अमेरिकेच्या व्हिसाशी संबंधित मालिकेपर्यंत सर्वदूर मुशाफिरी करण्याची संधी त्यांना इथे मिळाली. आकर्षक मथळ्यांमुळे त्यांच्या बातम्या वाचकांच्या पसंतीस उतरल्या.
२०२२ पासून महाराष्ट्र टाइम्ससाठी काम करताना त्यांनी राज्य ते राष्ट्रीय स्तरावरील राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, क्रीडा या क्षेत्रातील बातम्यांना प्राधान्य दिलं. बातमी मागील बातमी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सातत्यानं केला. घडामोडींचं विश्लेषण करणारे लेख त्यांनी लिहिले. एकनाथ शिंदे यांचं बंड, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, त्यामुळे बदललेलं राजकारण या नाट्यमय घडामोडींवर त्यांनी विस्तृत लिखाण केलं. सखोल माहिती घेऊन घडामोडींचं विश्लेषण करण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. घटनांमागील रंजक घडामोडी, वर्तमानातील बातम्यांची पार्श्वभूमी, त्यांचे होणारे परिणाम, सत्ताकारणासाठी सुरु असलेले शह-काटशह यावर त्यांनी सविस्तर लिखाण केलं. भाजपचे माजी खासदार आणि वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन रोखठोक सवाल करणारा त्यांचा व्हिडीओ समाज माध्यमांवर विशेष गाजला.
शैक्षणिक पात्रता कुणाल गवाणकर यांनी २०१३ मध्ये पाटकर महाविद्यालयातून बीएमएमची पदवी संपादन केली. शालेय आणि बारावीपर्यंतचं शिक्षण दहिसरमधील शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीत झालं. विद्यार्थीदशेत असतानाच त्यांना लिखाणाची गोडी लागली. मराठी भाषेवर प्रभुत्व असल्यानं त्यांनी निबंध स्पर्धेत अनेक पारितोषिकं जिंकली. बारावीच्या बोर्ड परीक्षेमेध्ये मराठी विषयात कनिष्ठ महाविद्यालयातून सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होण्याचा मान त्यांनी पटकावला. त्यानंतर त्यांनी पत्रकारिकेचं शिक्षण घेतलं. शिक्षण घेत असतानाचा त्यांनी या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती.… आणखी वाचा