• Sat. Jun 6th, 2026

    मार्च २०२७ पर्यंत वैद्यकीय महाविद्यालयाचे काम पूर्ण करा; अन्यथा कंत्राटदारांवर कारवाई-पालकमंत्री हसन मुश्रीफ – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jun 4, 2026
    मार्च २०२७ पर्यंत वैद्यकीय महाविद्यालयाचे काम पूर्ण करा; अन्यथा कंत्राटदारांवर कारवाई-पालकमंत्री हसन मुश्रीफ – महासंवाद

    नंदुरबार, दिनांक  जून २०२६ (जिमाका): नंदुरबार जिल्ह्यातील गरीब व आदिवासी नागरिकांना अधिक दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असून जननायक बिरसा मुंडा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व वसतिगृहाचे बांधकाम मार्च 2027 पर्यंत पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी गतीने काम करावे, असे निर्देश राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. निर्धारित मुदतीत काम पूर्ण न झाल्यास संबंधित कंत्राटदार कंपनीवर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

    पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी आज नंदुरबार येथील शासकीय रुग्णालय तसेच जननायक बिरसा मुंडा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामाची पाहणी करून सविस्तर आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजय राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विनय सोनवणे, जिल्हा नियोजन अधिकारी शशांक काळे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

    यावेळी बोलताना पालकमंत्री डॉ. मुश्रीफ म्हणाले की, नंदुरबार हा आदिवासी बहुल जिल्हा असून येथील बहुतांश नागरिक शासकीय आरोग्य यंत्रणेवर अवलंबून आहेत. त्यामुळे रुग्णांना आधुनिक आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे ही शासनाची प्राथमिकता आहे. रुग्णालयातील आवश्यक सुविधा वाढविण्यासाठी तसेच विविध त्रुटी दूर करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. जिल्हा नियोजन समिती आणि संबंधित विभागांच्या माध्यमातून आरोग्य सेवांचे बळकटीकरण करण्यात येणार आहे.

    वैद्यकीय महाविद्यालय व वसतिगृहाच्या बांधकामाचा आढावा घेताना पालकमंत्र्यांनी गेल्या काही महिन्यांत कामाची गती अपेक्षेप्रमाणे नसल्याचे निदर्शनास आणून देत आतापर्यंत सुमारे 43 टक्के काम पूर्ण झाले आहे. निधी उपलब्ध असतानाही प्रकल्पाला अपेक्षित वेग मिळालेला नसल्याने कामकाजात अधिक समन्वय आणि गती आणण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

    कामाला वेग देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दर आठवड्याला आढावा घ्यावा, प्रगतीचा नियमित अहवाल सादर करावा आणि संबंधित यंत्रणांनी जबाबदारीने काम करावे, असे निर्देश त्यांनी दिले. पावसाळ्यात बाह्य कामांवर मर्यादा येण्याची शक्यता लक्षात घेता अंतर्गत कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी कंत्राटदारांनी आवश्यक मनुष्यबळ वाढविण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.

    वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी पिण्याच्या पाण्याच्या योजनेसाठी 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून वीज पुरवठ्याचा प्रश्नही लवकरच मार्गी लागणार आहे. महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याबाबतची अडचण जिल्हा प्रशासनाने दूर केली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

    नवीन वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाची उभारणी पूर्ण झाल्यानंतर नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांना अधिक आधुनिक, सक्षम आणि दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प निर्धारित कालावधीत पूर्ण करण्यासाठी प्रशासन आणि संबंधित यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत राहतील, असे पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.

    0000000000

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed