• Tue. Jun 16th, 2026

    शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका – पालकमंत्री हसन मुश्रीफ   – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jun 4, 2026
    शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका – पालकमंत्री हसन मुश्रीफ   – महासंवाद

    नंदुरबार, दिनांक जून २०२६ (जिमाका): नंदुरबार जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही परिस्थितीत शेतकरी, नागरिक तसेच अत्यावश्यक सेवांना इंधनाची कमतरता भासू नये यासाठी पुरेशा साठ्याची उपलब्धता कायम राखावी, असे निर्देश राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहेत.

    जिल्ह्यातील इंधन साठा, पुरवठा व्यवस्था आणि वितरणाची सद्यस्थिती याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीत आमदार राजेश पाडवी, आमश्या पाडवी, जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी, जिल्हा पुरवठा अधिकारी कैलास पवार व तेल कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. इंधनाच्या उपलब्धतेबाबत नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे.

    बैठकीत जिल्ह्यातील पेट्रोल व डिझेल साठ्याची स्थिती, पुरवठा साखळी आणि वितरण व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. ३ जून २०२६ रोजीच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात एकूण ९१ पेट्रोल पंप कार्यरत असून त्यामध्ये हिंदुस्तान पेट्रोलियम (एचपीसीएल) चे २९, भारत पेट्रोलियम (बीपीसीएल) चे ३१ आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (आयओसीएल) चे ३१ पेट्रोल पंप आहेत. जिल्ह्यात दररोज सरासरी २८६.३५ किलोलीटर इंधनाची विक्री होत असून सध्या एकूण ६४०.७५ किलोलीटर इतका पेट्रोल-डिझेलचा शिल्लक साठा उपलब्ध आहे. यामध्येएचपीसीएलकडे १५८.७२ किलोलीटर, बीपीसीएलकडे २२१.७३ किलोलीटर आणि आयओसीएलकडे २६०.३० किलोलीटर इतका साठा उपलब्ध आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार जिल्ह्याच्या इंधन गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले.

    बैठकीत इंधन कंपन्यांच्या विक्री अधिकाऱ्यांना पेट्रोल व डिझेलचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी दिल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत शेतकरी, नागरिक तसेच अत्यावश्यक सेवांना इंधनाची कमतरता भासू नये यासाठी पुरेशा साठ्याची उपलब्धता कायम राखावी, असे निर्देश देण्यात आले. तसेच पेट्रोल पंप चालकांशी सातत्याने समन्वय ठेवून पुरवठा व्यवस्थेवर बारकाईने लक्ष ठेवण्याचेही निर्देश यावेळी पालकमंत्री यांनी दिले आहेत.

    जिल्ह्यात इंधनाचा कोणताही तुटवडा नसून पुरेसा साठा उपलब्ध असल्याने नागरिकांनी घाबरून जाऊन अनावश्यक इंधन खरेदी करू नये तसेच अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाकडून प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन यावेळी पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी केले. आवश्यकतेनुसार तक्रार निवारण व अधिक माहितीसाठी संबंधित इंधन कंपन्यांच्या विक्री अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

    0000000000

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed