• Fri. Jun 5th, 2026
    Raigad Politics : शिंदेंचा शब्द प्रमाण, रायगडमधील महायुतीतलं बंड शमवण्यात मोठं यश, वाचा Inside Story

    रायगडमधील महायुतीमधील बंड शमवण्यात महायुतीला मोठं यश आलं आहे. शिवसनेचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली दळवी यांनी अर्ज मागे घेतला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अमुलकुमार जैन, रायगड : कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार अनिकेत तटकरे यांचा विजयाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली दळवी या आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. कोकण विधान परिषद मतदारसंघासाठी जुईली दळवी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर महायुतीमध्ये खळबळ उडाली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील संख्याबळाच्या आधारावर ही जागा शिवसेनेला मिळावी, अशी कोकणातील शिंदे गटाच्या आमदारांची भूमिका होती. मात्र महायुतीच्या जागावाटपात ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गेली आणि त्यानंतर सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे यांना उमेदवारी देण्यात आली.

    कोकण विधान परिषद मतदारसंघाच्या निवडणुकीतून अखेर अपक्ष उमेदवार असलेल्या जुईली दळवी यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. यावेळेला मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले हजर होते. जुईली यांच्या वतीने विघ्नेश माळी हे सूचक होते. त्यांनी हा उमेदवारी अर्ज मागे घेतला. “जुईली यांची तब्येत ठिक नसल्यामुळे त्या येऊ शकल्या नाहीत”, असं विकास गोगावले यांनी सांगितलं. पालकमंत्री पदाबाबत विचारले असता याबाबत मुख्यमंत्री आणि आमचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील, असं विकास गोगावले म्हणाले.

    याआधी पडद्यामागे काय-काय घडलं?

    आमदार महेंद्र दळवी यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. शिवसेनेकडे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अधिक सदस्यसंख्या असताना जागा राष्ट्रवादीला देण्यात आल्याबद्दल त्यांनी आक्षेप घेतला होता. दरम्यान, कोकणातील महायुतीमध्ये कोणताही वाद निर्माण होऊ नये यासाठी २ जून रोजी मुंबईतील एक्सप्रेस टॉवर येथे मंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटाच्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून अनिकेत तटकरे यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्याचा निर्णय स्पष्ट करण्यात आला.

    सूत्रांच्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुती धर्म पाळण्याच्या सूचना पक्षातील नेत्यांना दिल्या असून त्यांच्या आदेशाचा मान राखत जुईली दळवी या उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शक्यता आहे. मात्र शिवसेनेची ताकद अधिक असताना राष्ट्रवादीला जागा देण्याच्या निर्णयाबाबत महेंद्र दळवी यांची नाराजी अद्याप कायम असल्याचे सांगितले जात आहे.

    दरम्यान, अनिकेत तटकरे यांच्या उमेदवारीला महायुतीचा अधिकृत पाठिंबा मिळाल्याने निवडणुकीतील समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलली आहे. जुईली दळवी यांनी माघार घेतल्याने अनिकेत तटकरे यांचा विजयाचा मार्ग अधिक सुकर होणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

    छत्रपती संभाजीनगमध्येही बंड शमले

    दरम्यान, महायुतीत केवळ रायगडच्या जागेवरुन मतभेद झाला नाही तर अनेक ठिकाणी मतभेद झाले. महायुतीमध्ये अनेक ठिकाणी बंडखोरी होताना दिसली. छत्रपती संभाजीनगर-जालना या जागेसाठी तर शिवसेना आणि भाजप यांच्यातला वाद टोकाला पोहोचला. भाजपकडून या जागेसाठी सुहास शिरसाट यांना अधिकृत महायुतीकडून उमेदवारी जाहीर झाली होती. दुसरीकडे शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार यांनीदेखील अर्ज दाखल केला होता. अब्दुल सत्तार यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला होता. भाजप ही स्लो पॉयजन असून शिवसेनेला हळूहळू संपवत असल्याचा आरोप अब्दुल सत्तार यांनी केला होता. यानंतर महायुतीत मोठा वाद होताना दिसला. अखेर एकनाथ शिंदे यांनी अब्दुल सत्तार यांच्यासोबत बातचित केल्यानंतर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोननंतर अब्दुल सत्तार यांचे बंड थंड झाले.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा