• Thu. Jul 23rd, 2026

    Mumbai Students Protest : आधी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ, नंतर खिशात पावडर टाकण्याची धमकी, हर्षवर्धनने सांगितली आपबीती

    Mumbai Students Protest : आधी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ, नंतर खिशात पावडर टाकण्याची धमकी, हर्षवर्धनने सांगितली आपबीती

    मुंबईत आंदोलक विद्यार्थ्याला एका पोलिसाने थेट ड्रग्जचे पॅकेट खिशात टाकून जेलमध्ये टाकण्याची धमकी दिली. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाल्याने समोर आला आहे. हा प्रकार कॅमेऱ्यात कैद करणारा तरुण हर्षवर्धन कदम याने आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : दिल्लीच्या जंतरमंतर येथे कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाच्या समर्थनार्थ मुंबईत विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. या आंदोलकांची पोलिसांनी धरपकड केली. या दरम्यान एका पोलीस कर्मचाऱ्याने विद्यार्थ्यांना खिशात 50-50 ग्रॅमचे पावडर टाकून जेलमध्ये टाकायची धमकी दिली. 50 ग्रॅमचे ड्रग्जचे पावडर खिशात टाकल्यानंतर जामीन देखील मिळणार नाही आणि आयुष्य बरबाद होईल, अशी धमकी पोलीस देत असल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं आहे. या संबंधित व्हिडीओ व्हायरल करणारा तरुण हर्षवर्धन कदम याने आपली भूमिका मांडली आहे. संबंधित व्हिडीओत हर्षवर्धन कदम हा देखील आहे.

    हर्षवर्धन कदम काय म्हणाला?

    “मी आणि माझे सहकारी शांततेत आंदोलन करत होतो. मला ताब्यात घेण्यात आलं होतं. मला तीन पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. आंदोलनादरम्यान मी माझा व्हिडीओ काढत होतो. हा व्हिडीओ मी माझ्यासाठी काढत होतो. या व्हिडीओत मी पोलिसांचं नाव घेत नव्हतो आणि कुणालाही काहीच बोलत नव्हतो. माझा सायलंट व्हिडीओ बनवत होतो. माझ्यावर कुणी हात उचलला वगैरे तर यामुळे माझ्या सुरक्षेसाठी व्हिडीओ घेत होतो”, असं हर्षवर्धन कदम याने स्पष्ट केलं.

    ‘पोलिसांनी दुसऱ्यांदा पाहिल्यावर ताब्यात घेतलं’

    “एका पोलिसाने पाहिलं की, मी रेकॉर्ड करतोय. त्याने मला विचारलं काय करतोय? मी सांगितलं, सर माफ करा. मी इथून जातो. पण मी तरी ऐकलं नाही. मी पुन्हा आंदोलनात सहभागी झालो. दुसऱ्यांदा पोलीस ग्रुपमध्ये आम्हाला पकडायला आले. मला पोलिसांनी दुसऱ्यांदा पाहिले त्यामुळे त्यांनी मला ताब्यात घेतलं”, असं हर्षवर्धनने सांगितलं.

    “पोलीस ताब्यात घेत असल्याने मी रेकॉर्ड करायला सुरुवात केली. तर एकाने माझा फोन घेण्याचा प्रयत्न केला. पण मी दिला नाही. मी सांगितलं की, सर मी रेकॉर्ड करणार. कारण हा माझा हक्क आहे. तुम्ही जबदरस्ती करु नका. त्यांनी सांगितलं की, काही जबरदस्ती करत नाही. मी माझा फोन बंद केला”, असंदेखील हर्षवर्धनने सांगितलं.

    ‘पोलिसाकडून अर्वाच्य शिवीगाळ’

    “नंतर दोन पोलीसवाले आले. एकाने माझे पाय पकडले आणि मला गाडीत टाकललं. जो आम्हाला घेऊन जाणारा होता तो सिस्टीमला, आंदोलकांना आणि आम्हाला शिवीगाळ करत होता. तो अर्वाच्य शिवीगाळ करत होता. पुढे ट्रॅफिक आल्याने पुढे जाता आलं नाही. पण मध्येच त्याने गाडी थांबवली. म्हणाला की, ट्रॅफीक आहे तर तुम्ही इथून जा.”

    थेट ड्रग्ज खिशात टाकण्याची पोलिसाची धमकी

    “आम्ही सांगितलं हो जातो सर. आम्ही जे केलं ते परत नाही करणार. आम्ही फक्त शांततेत आंदोलनस्थळी जाणार. त्यावर पोलीस कर्मचारी आम्हाला धमकी देऊ लागला. तुम्ही जर परत इथे दिसले तर तुमच्या खिशात 50 ग्रॅमचे ड्रग्जचे पावडर टाकून जेलमध्ये टाकणार. अशी धमकी पोलिसाने दिली. आता मी 18 वर्षांचा आहे. मला आणि माझ्या आईला मेसेज येत आहेत की, व्हायरल झालं. तुमच्या मुलाला हे येतं का? माझी आई घाबरणार नाही का? हे फक्त माझ्यासाठी नाही तर किती लोकांसोबत झालं असेल. माझ्या अनेक मित्रांना ताब्यात घेतलं आहे. किती लोकांचं डोकं फोडलं आहे.”

    आंदोलन करताना व्हिडीओ का बनवत होता?

    “आम्हाला आंदोलन करण्याआधी सांगितलं होतं की, तुम्ही आंदोलन करताना रेकॉर्ड करा. जेणेकरुन आंदोलन करताना तुमच्यासोबत कुणी गैरप्रकार केला तर आपल्याकडे पुरावा राहील. त्यामुळे आम्ही रेकॉर्ड करत होतो. आम्ही चार लोकं होतो. त्यापैकी दोन जण भगतसिंग यांचे पुस्तक आणि बॅनर घेऊन उभे होते. त्यांना ताब्यात घेतलं.”

    पोलीस धमकी देत असताना व्हिडीओत हसत का होता?

    “आम्ही परिस्थितीवर हसत होतो. आम्हाला ताब्यात घेतलं आहे आणि आम्हाला धमकी देत आहेत. व्हिडीओमध्ये मी खरंच घाबरताना दिसलो असतो तर जे आंदोलन करत आहेत ते घाबरले असते.”