• Thu. Jul 23rd, 2026
    Mumbai Protest: मुंबईत तरुणीचा दुर्गावतार! विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी गाडी अडवली, कोण आहे पोलिसांना नडणारी रिया अहिर?

    मुंबई: नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यात यावा, या मागणीसाठी विद्यार्थ्यांकडून देशभर आंदोलन सुरू असून महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईतही विद्यार्थी मोठ्या संख्येने रस्त्यावर येत आहेत. मात्र मुंबई पोलिसांनी जमावबंदी लादत विद्यार्थ्यांना आंदोलन करण्यास मनाई केली आहे. असं असतानाही दररोज शेकडो विद्यार्थी शहरातील विविध भागांमध्ये आंदोलन करत सरकारविरोधातील संताप व्यक्त करत आहे. मुंबईत कालही विद्यार्थ्यांकडून धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणीसाठी आंदोलन पुकारण्यात आलं होतं. विनापरवानगी आंदोलन केल्याप्रकरणी या विद्यार्थ्यांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलं आणि वाहनात बसवण्यात आलं. मात्र विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या पोलिसांच्या या वाहनासमोर एक तरुणी निर्धाराने उभी राहिली आणि पोलिसांना थांबावं लागलं. या दृश्याची देशभर चर्चा होत असताना या तरुणीबद्दलची माहिती समोर आली आहे.

    पोलिसांचे वाहन अडवणाऱ्या मुंबईतील या तरुणीचं नाव आहे रिया अहिर. रिया अहिर ही पेशाने अभिनेत्री आणि मॉडेल आहे. मागील काही दिवसांपासून ती विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सक्रिय आहे. मुंबई पोलिसांनी काल आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना ताब्यात घेतल्यानंतर तिचा संताप अनावर झाला. आधी रियाने पुढे होऊन पोलिसांचे वाहन अडवल्यानंतर रस्त्याच्या बाजूला असणारे इतर लोकही पुढे सरसावले आणि सर्वजणच रस्त्यावर उतरले.

    पोलिसांच्या कारवाईबद्दल आणि सरकारबद्दल संताप व्यक्त करताना रियाने म्हटलं आहे की, “हे पोलीस जे करत आहेत, ते त्यांचं काम आहे, हे मला माहीत आहे. पण ते त्यांचं काम प्रामाणिकपणे करत नाहीत. हे लोक आपल्या नागरिकांची जबाबदारी घेऊ शकत नसतील, तर ही जबाबदारी आम्ही घेऊ. त्यामुळे मी पोलिसांचे वाहन रोखले. माझे वडील शेतकरी नाहीत, मी शेतकरी नाही, दलित नाही, ओबीसी नाही. पण यांनी परवा आपल्या विद्यार्थ्यांसोबत जे केलं ते चुकीचं होतं. या कृत्याची जबाबदारी त्यांना घ्यावी लागेल. धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागेल,” अशी मागणी तिने केली आहे.

    विद्यार्थ्यांसोबत पालकही आंदोलनात

    विद्यार्थी आंदोलनात केवळ तरुणच नव्हे, तर पालकांचाही सहभाग लक्षवेधी ठरला. चेंबूर इथं आंदोलनात सामीला झालेल्या भक्ती सावंत आणि दीपाली राणे या दोन मातांनी आपल्या शालेय शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या भविष्यासाठी आंदोलनात सहभागी झाल्याचे सांगितले. ‘आमची मुले शाळेत आहेत. त्यांचे भविष्य सुरक्षित, पारदर्शक शिक्षण व्यवस्थेत असावे, म्हणून आम्ही आज येथे आलो आहोत’, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे हे आंदोलन केवळ विद्यार्थ्यांचे न राहता पालकांचाही आवाज ठरल्याचे दिसून आले.

    दुसरीकडे, दादरमधील आंदोलनात कर्करोगावर उपचार घेत असलेल्या एका महिलेची उपस्थिती अनेकांचे लक्ष वेधून घेणारी ठरली. आपली ओळख जाहीर न करण्याची विनंती करत त्यांनी प्रकृतीची पर्वा न करता आंदोलनात सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आणि लोकशाही पद्धतीने मत व्यक्त करण्याच्या अधिकारासाठी उपस्थित राहणे गरजेचे वाटल्याचे त्यांनी सांगितले.