• Fri. Jun 5th, 2026

    Bhaskar Jadhav : ‘भाजपला एकनाथ शिंदे ओझं वाटायला लागले’, भास्कर जाधवांचा दावा, दोन्ही शिवसेना एकत्र येण्याबाबतच्या प्रश्नाचं दिलं उत्तर

    Bhaskar Jadhav : ‘भाजपला एकनाथ शिंदे ओझं वाटायला लागले’, भास्कर जाधवांचा दावा, दोन्ही शिवसेना एकत्र येण्याबाबतच्या प्रश्नाचं दिलं उत्तर

    ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी एकनाथ शिंदे यांच्याबद्दल मोठा दावा केला आहे. भाजपला एकनाथ शिंदे ओझं वाटायला लागले असल्याचा खळबळजनक दावा भास्कर जाधव यांनी केला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    रत्नागिरी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवरुन मोठा दावा केला आहे. कोकणातील विधान परिषदेची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुटली आहे. पण शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या मुलीने देखील या ठिकाणी अर्ज दाखल केला आहे. या जागेवर शिवसेनेचा दावा होता. पण शिवसेनेला जागा न मिळाल्याने शिवसेनेचे नेते नाराज असल्याचा दावा भास्कर जाधव यांनी केला आहे. तसेच रायगडची जागा राष्ट्रवादीला सुटण्यामागे भाजपची रणनीती असल्याचा दावा भास्कर जाधव यांनी केला आहे. तसेच “भाजपला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ओझं वाटायला लागले आहेत’, असा खळबळजनक दावा भास्कर जाधव यांनी केला आहे.

    “कोकणात शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व आहे. हेच वर्चस्व शिंदे गटाला अडचणीचं ठरत आहे. कारण कितीही प्रयत्न केले तरी भाजप कोकणात वाढू शकत नाही हे भाजपच्या नेतृत्वात लक्षात आलं आहे. अनेक मोठमोठ्या नेत्यांना त्यांनी आपल्या पक्षात घेतली. पण शिवसेनेकडे नागरिकांची ओढ जास्त आहे. हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आलं आहे. त्यामुळे इथे आणखी शिवसेना बळकट होण्याच्याऐवजी राष्ट्रवादी वाढली तरी चालेल, पण शिवसेनेचं खच्चिकरण कसं केलं जाईल या विचारातून राष्ट्रवादीला कोकणातील विधान परिषदेची जागा देण्यात आली आहे. संख्याबळाच्या दृष्टीने ही जागा शिवसेनेलाच मिळायला पाहिजे”, असा दावा भास्कर जाधव यांनी केला

    “गृह राज्यमंत्री योगेश कदम नाराज आहेत, अशी बातमी आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा अर्ज दाखल करायला शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले आले नव्हते. आमदार महेंद्र दळवी आले नव्हते. ते नाराज असल्यामुळे येऊ शकले नाहीत”, असादेखील दावा त्यांनी केला.

    “सगळं काही आलबेल नाही. सुनील तटकरे यांची कार्यपद्धत आहे की, गरज असेल तेव्हा कुणालाही रामराम करायचं आणि गरज नसेल तेव्हा लांबलांब कसं करायचं हे उत्तम कौशल्य त्यांच्याकडे आहे. त्यामुळे सगळ्यांना त्याचा अनुभव आलेला आहे. म्हणूनच सगळे नाराज आहेत. पण दोन नाराज असतील त्यांना बाजूला करायचं. दुसऱ्याला सोबत करायचं असं आहे”, अशी टीका भास्कर जाधव यांनी केली.

    भास्कर जाधवांचा तटकरेंना टोला

    “कोकणातील विधान परिषदेची जागा ही शिवसेनेचीच होती, शिवसेनेचीच आहे आणि शिवसेनेलाच मिळायला पाहिजे होती. पण सुनील तटकरे यांच्याकडे काय जादूटोणा आहे, कुठली भानामती त्यांच्याकडे आहे, हे कळायला काही मार्ग नाही. सगळ्यात जास्त कमी ज्या पक्षाची जागा त्या पक्षाला जागा मिळाली आणि टोकाचे विरोध करणारे लोक हे सुद्धा त्याचे समर्थन करतात. ही फारच आश्चर्याची गोष्ट आहे. म्हणून तटकरे यांच्याकडे भानामती कोणती आहे ती समजून घ्यावी लागेल”, असा टोला भास्कर जाधव यांनी लगावला.

    एकनाथ शिंदे यांच्याबद्दल मोठा दावा

    “पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि शिंदे गटाची शिवसेना ही एकत्र येवो, न येवो, हा निर्णय शेवटची आमचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे घेऊ शकतात. पण गोष्ट खरी आहे, भाजपसाठी एकनाथ शिंदे हे अडचणीचे झाले आहेत. एकनाथ शिंदे त्यांना ओझं वाटायला लागलं आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे नावाचं ओझं खांद्यावरुन उतरवण्याचा मार्ग भाजप शोधत आहे”, असा दावा जाधव यांनी केला.

    “आता राजकारणाची समीकरणे काय बदलतील? ठाकरे बंधूंनी मुंबई महापालिकेची निवडणूक तर एकत्र लढवली. दोन्ही एकत्र असणं नसणं हे त्या-त्या वेळची परिस्थिती आहे. गुढीपाडव्याला दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले होते. एकत्र येणं हे होतंच राहील”, अशी प्रतिक्रिया भास्कर जाधव यांनी दिली.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा