मुंबई, दि. २१ : मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुंबई शहर जिल्ह्यातील मतदारसंघात 23 व 26 जुलै, 2026 रोजी स. 10.00 ते सायं.6.00 या कालावधीत ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे’ आयोजन करण्यात आले आहे.
23 जुलै 2026 रोजी 180-वडाळा विधानसभा मतदासंघ, निको हॉल, प्लॉट नं. 432 नायगाव क्रॉस रोड, वडाळा उद्योग भवन, वडाळा (प), मुंबई – 400031 येथे व 26 जुलै 2026 रोजी 178- धारावी, विधानसभा मतदासंघ, भारतरत्न राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुल, धारावी, बस डेपोजवळ, धारावी, मुंबई – 400017 येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी मुंबई शहर जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना महसूल विभागामार्फत देण्यात येणाऱ्या विविध योजनांसोबतच केंद्र शासनाचे/राज्य शासनाचे विविध विभाग/स्थानिक स्वराज्य संस्था यांचेकडील विविध योजनांचा लाभ तसेच सेवा हमी कायद्यानुसार द्यावयांचा सेवा (जसे विविध दाखले, नवमतदारांची नोंदणी, संजय गांधी निराधार योजना अनुदान, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना अनुदान, शिधापत्रिकेसंबंधित सेवा, मत्स्य विभागाकडील विविध सेवा, बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत पुरविण्यात येणारे जन्म प्रमाणपत्र, मृत्यू प्रमाणपत्र, विवाह नोंदणी प्रमाणपत्र इ. चा) लाभ नागरिकांना देण्यात येणार आहे.
शासनाने महसूल विभाग अधिक लोकाभिमुख, पारदर्शक व गतिमान करण्यासाठी जाणीवपूर्वक निर्णय घेतले आहेत. या निर्णयाचा लाभ तळागाळातल्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्मदिवस तसेच माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून राज्यामध्ये 22 जुलै, 2026 ते 2 ऑगस्ट, 2026 या कालावधीत कोणत्याही एका दिवशी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान” राबविण्याबाबत मंजूरी देण्यात आलेली आहे.
तरी सर्व नागरिकांनी या शिबिरामधील योजनांचा व सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
0000
