• Sun. Jun 7th, 2026

    मुंबई राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार अध्यक्षपदाचा पदभार मंत्री जयकुमार रावल यांनी स्वीकारला – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jun 2, 2026
    मुंबई राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार अध्यक्षपदाचा पदभार मंत्री जयकुमार रावल यांनी स्वीकारला – महासंवाद

    मुंबई, दि. २ : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला आता राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार (एमएनआय) म्हणून घोषित करण्यात आला असून पणन मंत्री जयकुमार रावल यांची राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजाराचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अध्यक्षपदाचा पदभार मंत्री जयकुमार रावल यांनी आज वाशी येथील कार्यालयात जाऊन स्वीकारला. नवीन व्यवस्थेच्या अंमलबजावणीचा भाग म्हणून नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले असून बाजाराचे प्रशासन आता नव्या कायदेशीर तरतुदींनुसार चालविण्यात येणार आहे.

    महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने २९ मे २०२६ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजाराला ‘राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार’ म्हणून घोषित करण्यात आले आहे.

    या निर्णयामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजाराला राष्ट्रीय स्तरावरील महत्व प्राप्त झाले असून देशभरातील कृषी व्यापार, निर्यात आणि कृषी मालाच्या विपणन व्यवस्थेला अधिक गती मिळणार आहे. शेतकरी, व्यापारी आणि कृषी क्षेत्राशी संबंधित घटकांना याचा मोठा फायदा होईल. जागतिक पणन व्यवस्थेशी स्पर्धा करण्याच्या दृष्टीने हे महत्वाचे पाऊल ठरणार आहे.

    राज्य शासनाच्या या निर्णयामुळे मुंबई बाजाराची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील ओळख अधिक मजबूत होणार असून कृषी विपणन क्षेत्रात महाराष्ट्राचे स्थान अधिक बळकट होईल, असा विश्वास मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केला.

    0000

    बी.सी.झंवर/विसंअ

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed