सध्या राज्यातील सर्वाधिक वर्दळीचे मानले जाणारे शिवाजीनगर आगार वाकडेवाडी येथील भाडेतत्त्वावरील जागेवर सुरू असून, मूळ जागेवर स्थानक उभारणीचा प्रकल्प सहा वर्षांहून अधिक काळ रखडलेला आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने शिवाजीनगरच्या जागेबरोबरच आता वाकडेवाडी येथे सध्या सुरू असलेल्या एसटी स्थानकाजवळील आरे डेअरीची संपूर्ण जागा स्थानकासाठी देण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. ही जागा मिळाल्यास वाकडेवाडी येथे राज्यातील सुसज्ज एसटी स्थानक बांधणे शक्य होणार आहे. शिवाजीनगर येथे एसटी स्थानकाची जागा ‘महामेट्रो’ला देण्यात आली. त्या ठिकाणी मेट्रो स्थानक उभारताना एसटी स्थानकाचाही विकास करण्यात येणार होता; पण नंतर सरकार बदलल्यानंतर एसटी महामंडळ व ‘महामेट्रो’ यांच्यातील करार फिस्कटला. त्यानंतर आतापर्यंत शिवाजीनगर येथे एसटी स्थानक बांधण्यात यश आलेले नाही.
Pune News: एअर फोर्समधील 41 वर्षीय सार्जंटचा दुर्दैवी मृत्यू; खडकवासला कालव्यात पोहताना घडली घटना
शिवाजीनगर येथून वाकडेवाडीच्या आरे डेअरीच्या जागेत शिवाजीनगर एसटी स्थानक सुरू करण्यात आले. सुरुवातीला या स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत होता. आता प्रवाशांना थोडीशी सोय झाली असून, हे स्थानक अंगवळणी पडले आहे; तसेच वाढती प्रवासी संख्या पाहता शिवाजीनगरची जागा अपुरी पडण्याची शक्यता आहे; त्यामुळे सध्या वाकडेवाडी येथील आरे डेअरीची उर्वरित जागाही एसटीला मिळाल्यास त्या ठिकाणी राज्यातील सर्वाधिक मोठे स्थानक उभारले जाऊ शकते.
जुन्या शिवाजीनगर एसटी स्थानकाच्या ठिकाणी सध्या एसटीला एक हेक्टर १८ आर जागा शिल्लक आहे. त्या ठिकाणी वर्कशॉप, एसटी स्थानक उभारण्यासाठी जागा कमी पडू शकते. त्यामुळे तिथे स्थानक उभारून मोठे स्थानक उभारण्यासाठी ‘आरे’ची वाकडेवाडीची जागा एसटीला मिळाल्यास मोठा फायदा होणार आहे. वाकडेवाडी एसटी स्थानक परिसरात ‘आरे’ची एकूण दोन हेक्टर जागा आहे. या ठिकाणी भव्य स्थानक, बस पार्किंगसाठी जागा, निवासी वाहनचालकांसाठी क्वार्टर्स असे भव्य स्थानक उभारणे शक्य होणार आहे. त्यामुळेच पुणे एसटी विभागाने वाकडेवाडीची आरेची जागा त्यांना मिळावी, अशी मागणी केली आहे. ही जागा मिळाल्यास एसटी महामंडळाबरोबरच पुण्यातील प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अपघातात दोघांचा करुण अंत; खंडाळा घाटातील घटना, तिघे गंभीर जखमी
शिवाजीनगर बसस्थानक दृष्टिक्षेपात
२००हून अधिक दिवसाला सुटणाऱ्या गाड्या
१२०० एकूण फेऱ्या
५४ ते ५५ हजार दिवसाचे किलोमीटर
२०,००० सरासरी प्रवासीसंख्या
Deccan Queen: ‘दख्खनची राणी’ झाली 96 वर्षांची! पुणे रेल्वे स्थानकावर केक कापून जल्लोषात साजरा केला वाढदिवस
‘शिवाजीनगर ‘चा विकास का महत्त्वाचा ?
पुण्यातील शिवाजीनगर (सध्याचे वाकडेवाडी) आगार हे राज्यात सर्वांत मोठ्या आगारांपैकी एक समजले जाते. या ठिकाणाहून राज्याच्या कानाकोपऱ्यात बस धावतात. त्यामुळे प्रवाशांची कायम या ठिकाणी गर्दी असते. शिवाजीनगर आगारातून ई-शिवाई, लालपरी, जनशिवनेरी, शिवशाही, स्लीपर अशा सर्व प्रकारच्या बस वेगवेगळ्या मार्गावर धावतात. दिवसाला साधारण दोनशेपेक्षा जास्त बस शिवाजीनगर आगारातून सोडल्या जातात; तसेच इतर आगारांच्या येणाऱ्या-जाणाऱ्या अशा साधारण १२०० बसच्या फेऱ्या होतात. शिवाजीनगर आगाराच्या बस साधारण दिवसाला ५४ ते ५५ हजार किलोमीटर अंतर धावतात. राज्यात एका आगाराचे दिवसातील सर्वाधिक किलोमीटर धावण्यात शिवाजीनगर पहिल्या क्रमांकावर होते.
वाकडेवाडी येथील स्थानकाची ‘आरे’ची जागा एसटीला मिळावी म्हणून मागणी करण्यात आली आहे. ही जागा मिळाल्यास त्या ठिकाणी भव्य एसटी स्थानक उभारणे शक्य होईल. त्याचा प्रवाशांना फायदा होणार आहे. – अरुण सिया, विभाग नियंत्रक, पुणे एसटी विभाग
