• Sun. Jun 14th, 2026
    MLC Election : दोस्तीत कुस्ती! अनेक ठिकाणी बंडखोरी, विधान परिषदेच्या निवडणुकीत नाट्यमय घडामोडी

    विधान परिषदेच्या 16 जागांसाठी निवडणूक पार पडत आहे. या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. त्यानुसार विविध पक्षांच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. पण या निवडणुकीत महायुतीत अनेक ठिकाणी बंडखोरी होताना दिसत आहे. ही बंडखोरी रोखणं हे पक्षश्रेष्ठींपुढे मोठं आव्हान आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीत अनेक ठिकाणी बंडखोरी झालेली बघायला मिळत आहे. बंडखोरांची मनधरणी करणं हे प्रत्येक पक्षाच्या वरिष्ठांपुढे मोठं आव्हान आहे. छत्रपती संभाजीनगर-जालना या जागेसाठी महायुतीत विशेषत: शिवसेना आणि भाजपात प्रचंड रस्सीखेच झाली. गेल्यावेळी या जागेवर शिवसेनेचे आमदार होते. त्यामुळे शिवसेनेकडून या जागेवर दावा सांगण्यात येत होता. पण भाजपने आपल्याकडे सर्वाधिक लोकप्रतिनिधी असल्याचा दावा करण्यात आला. सर्वाधिक जागा जिल्ह्यात आपल्याकडे असल्याने भाजपने आपली मागणी लावून धरली. अखेर भाजपला ही जागा मिळाली. भाजपकडून सुहास शिरसाट यांना उमेदवारी देण्यात आली आहे. असं असताना शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार यांनी अर्ज दाखल केला आहे. हा अर्ज दाखल केल्यानंतर सत्तार यांनी भाजपवर सडकून टीकादेखील केली आहे.

    सोलापुरातही बंडखोरी

    महायुतीत अनेक ठिकाणी बंडखोरी झालेली बघायला मिळत आहे. सोलापुरात महायुतीत सारं काही आलबेल आहे असं दिसत नाहीय. भाजपचे उमेदवार म्हणून राजेंद्र राऊत यांची घोषणा झाली असली तरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना पक्षाच्या नेत्याने विधान परिषदेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शिवसेना नेते रमेश बारसकर यांनी शिवसेनेतर्फे शुक्रवारी आपला अर्ज घेतला होता. यानंतर त्यांनी आज सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्जाचा आज शेवटचा दिवस होता. रमेश बारसकर यांनी भाजप उमेदवाराविरोधात उमेदवारी अर्ज भरत दंड थोपटले आहेत. उमेदवारी अर्ज भरून बाहेर आल्यानंतर शिवसेना नेते रमेश बारसकर यांनी थेट पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. “पालकमंत्री जयकुमार गोरे हे सोलापूरचे पालक नसून दोन आमदारांचे चालक आहेत”, अशा भाषेत त्यांनी निशाणा साधला आहे.

    शिवसेनेचे मोहोळ येथील नेते रमेश बारसकर यांनी सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. “अर्ज भरून आल्यानंतर रमेश बारसकर यांनी महायुतीमध्ये आहोत. मात्र पालकमंत्री हे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नसून दोन आमदारांचे चालक मंत्री आहेत”, अशी टीका त्यांनी केली.

    ‘वरिष्ठांशी चर्चा करून माघारी घेऊ’, ज्योती वाघमारे यांनी दिली प्रतिक्रिया

    रमेश बारसकर यांनी दाखल केलेल्या उमेदवारीवर शिवसेनेच्या खासदार ज्योती वाघमारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “लोकशाहीमध्ये उमेदवारी अर्ज भरणे, निवडणुकीत इच्छा दर्शवणे, निवडणुकीला थांबणे ही नवल नाही. महायुतीमध्ये आम्ही सर्व एकत्र आहोत. रमेश बारसकर यांनी शिवसेनेकडून विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे महायुतीमधील वरिष्ठ नेते चर्चा करतील आणि शिवसेनेची उमेदवारी माघारी घेतील”, असा विश्वास खासदार ज्योती वाघमारे यांनी व्यक्त केला आहे.

    रायगडमध्येही महायुतीत बंडखोरी

    रायगडमध्येदेखील महायुतीत बंडखोरी झाल्याचं बघायला मिळालं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली दळवी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पण महायुतीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अधिकृतपणे मिळाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अनिकेत तटकरे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यांनी आज अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल केला. पण महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली दळवी यांनी अपक्ष उमेदवारी आर्ज दाखल केल्याने इथे बंडखोरी झालेली बघायला मिळत आहे.

    रायगडमधील बंडखोरीवर शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली दळवी यांनी अर्ज दाखल केला असला तरी अर्ज मागे घेण्याची तारीख अजून दोन-तीन दिवस आहे. त्यामुळे महायुतीत एकमेकांसमोर कोणी उभे राहणार नाही याची दक्षता आम्ही नक्की घेऊ. महेंद्र दळवी यांच्यासोबत चर्चा करुन त्यांची समजूत काढू

    महायुतीत नाशिकमध्ये बंडखोरी

    महायुतीत नाशिकची जागा ही शिवसेनेला सुटली आहे. शिवसेनेकडून नरेंद्र दराडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. असं असलं तरी भाजपचे नेते गोकुळ गिते आणि गणेश गिते यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे अर्ज दाखल करणारे दोन्ही नेते हे मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

    अमरावतीत महायुतीत बंडखोरी

    अमरावती मतदारसंघात देखील बंडखोरी झाली आहे. अमरावती विधान परिषदेची जागा ही भाजपसाठी सुटली आहे. भाजपकडून प्रवीण पोटे यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे. तर शिवसेनेच्या विप्लव बजोरिया यांनी देखील अर्ज दाखल केला आहे. आपला अर्ज कायम ठेवणार असून आपलाच विजय होईल, अशी प्रतिक्रिया विप्लव बजोरिया यांनी दिली आहे.

    पुण्यात राष्ट्रवादीतीलच दोन नेत्यांनी अर्ज दाखल केले

    महायुतीत पुणे विधान परिषदेची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुटली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विक्रम काकडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. विक्रम काकडे यांनी आज उमेदवारी अर्जदेखील दाखल केला. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुनील टिंगरे यांनीदेखील डमी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रवादीतील या घडामोडी पाहता सुनेत्रा पवार यांनी कुणीही नाराज होऊ नये, एकजूट राहवं, असं आवाहन सुनेत्रा पवार यांनी केल्याचं वृत्त काही माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलं आहे. विक्रम काकडे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर इच्छूक असलेले सुरेश घुले आणि सुनील टिंगरे हे नाराज असल्याची चर्चा आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा