• Sun. Jun 14th, 2026
    Thane News: तुकाराम मुंढेंचा धडाका! स्प्रे मारुन पिकवले जाणारे 11 लाखांचे आंबे जप्त, ठाण्यात FDAची धडक कारवाई, 37 जणांना अटक, 31 दुकांनाना टाळे

    तुकाराम मुंडेंचा धडाका! स्प्रे मारून पिकवले जाणारे ११ लाखांचे आंबे जप्त; ठाण्यात FDAची मोठी कारवाई

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अमुलकुमार जैन, ठाणे: अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभरात कारवाईचा धडाका सुरू केला आहे. त्याचाच भाग म्हणून ठाणे जिल्ह्यात ३० आणि ३१ मे रोजी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी मोठी मोहीम राबवत नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटसह विविध भागांत धाडी टाकल्या. या कारवाईत कृत्रिम पद्धतीने पिकवण्यात आलेल्या आंब्यांचा मोठा साठा जप्त करण्यात आला.

    एफडीएच्या तपासात काही व्यापारी आंबे पिकवण्यासाठी नियमबाह्य पद्धतीने इथिलिनसदृश्य स्प्रेचा थेट वापर करत असल्याचे उघड झाले. याप्रकरणी तीन मोठ्या आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. तब्बल ३,४५३ किलो आंबे जप्त करण्यात आले असून त्यांची किंमत ११ लाख १२ हजार ८५० रुपये आहे. जप्त केलेल्या आंब्यांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.

    Thane FDA Action, Tukaram Mundhe

    नियमांचे उल्लंघन उघड

    एफएसएसएआयच्या नियमांनुसार फळांवर थेट इथिलिन स्प्रे मारण्यास बंदी आहे. फळे पिकवण्यासाठी इथिलिन गॅस चेंबरचा वापर करणे बंधनकारक आहे. मात्र तपासणीत अनेक व्यापारी नियमांचे उल्लंघन करताना आढळले. दिलासादायक बाब म्हणजे कॅल्शियम कार्बाइड या घातक रसायनाचा वापर कुठेही आढळून आला नाही.

    Maharashtra TimesMHADA Lottery 2026: मुंबईतल्या 2640 घरांसाठी 75 हजार अर्ज, आता सर्वांचे लक्ष सोडतीच्या तारखेकडे, कधी होणार ड्रॉ?

    गुटखा-पानमसाल्यावरही कारवाई

    जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त २९ ते ३१ मेदरम्यान गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूविरोधातही विशेष मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत ३६ आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. ४ लाख ७४ हजार ४०७ रुपयांचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला.

    Thane FDA Action, Tukaram Mundhe

    या प्रकरणात विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले असून आतापर्यंत ३७ जणांना अटक झाली आहे. तसेच नियमांचे उल्लंघन करणारी ३१ आस्थापने सील करण्यात आली आहेत.

    नागरिकांना आवाहन

    भेसळयुक्त किंवा प्रतिबंधित अन्नपदार्थांची माहिती मिळाल्यास नागरिकांनी तातडीने तक्रार करावी, असे आवाहन एफडीएने केले आहे. तक्रारींसाठी १८००२२२३६५ हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. प्रशासनाची ही मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा