मुंबई, दि. २९ : मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या वतीने १८३-शिवडी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रीय मजदूर संघाच्या महात्मा गांधी सभागृहात महसूल समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात १२३ लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
महसूल विभाग अधिक लोकाभिमुख, पारदर्शक व गतिमान करण्यासाठी तसेच शासनाच्या योजना तळागाळातील शेवटच्या नागरिकापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून मुंबई शहर जिल्ह्यात २२ जुलै ते २ ऑगस्ट २०२६ या कालावधीत प्रत्येक विधानसभा मतदारसंघात या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शुभेच्छा संदेशही यावेळी प्रसारित करण्यात आला.
आमदार व महाराजस्व समिती सदस्य डॉ. मनीषा कायंदे यांनी ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमानंतर आता महसूल समाधान शिबिराच्या माध्यमातून शासनाच्या सेवा अधिक प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचत असल्याचे सांगितले. या अभियानाचा व्यापक प्रचार-प्रसार करून अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा, असे त्यांनी नमूद केले. आमदार अजय चौधरी यांनी गरजवंत नागरिकांना त्यांच्या दारापर्यंत सेवा पोहोचविणारा हा स्तुत्य उपक्रम असल्याचे सांगत, शासनाच्या सुविधा तळागाळातील नागरिकांपर्यंत अधिकाधिक प्रमाणात पोहोचविण्यावर भर देण्याची गरज व्यक्त केली.
उपजिल्हाधिकारी संजय पाटील म्हणाले, महसूल विभागासह विविध शासकीय विभागांच्या सेवा नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. महसुली दाखले, आधार सेवा, दिव्यांग सेवा, संजय गांधी निराधार योजना, रेशन कार्ड विषयक सेवा, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध सेवा आदी सुविधांचा लाभ या शिबिरातून दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांना कामासाठी विविध शासकीय कार्यालयांमध्ये जावे लागू नये आणि आवश्यक सेवा एकाच ठिकाणी सुलभपणे उपलब्ध व्हाव्यात, यासाठी महसूल विभागामार्फत ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान’ राबविण्यात येत आहे. शासनाच्या विविध विभागांच्या २८ सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात येत असून, अधिकाधिक नागरिकांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुंबई शहर उपजिल्हाधिकारी संजय पाटील यांनी केले.
कार्यक्रमास महिला व बालविकास अधिकारी तृप्ती पवार, जान्हवी दमनकर, जितेंद्र सपकाळ, रेश्मा सपकाळ यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. दीपा शिंदे यांनी, तर आभार प्रदर्शन तहसीलदार संदीप आवारी यांनी केले.
0000
बी.सी.झंवर/विसंअ
