युद्ध परिस्थितीमुळे भारतातून परदेश प्रवासाला मोठा फटका बसला आहे. उन्हाळ्यी सुट्ट्यांमुळे मार्च-एप्रिलमध्ये परदेश प्रवाशांची संख्या नेहमी अधिक असते पण यंदा ती लक्षणीयरित्या कमी झाली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म.टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: सुट्यांच्या हंगामात परदेश पर्यटनाला मोठी पसंती मिळते. मात्र यंदा मार्च आणि एप्रिल या दोन्ही महिन्यांत भारतातून परदेशात जाणाऱ्या प्रवासीसंख्येत मोठी घट नोंदवण्यात आली आहे. युद्धजन्य परिस्थिती, हवाई क्षेत्रावरील निर्बंध आणि प्रवाशांमध्ये निर्माण झालेली असुरक्षिततेची भावना यांचा थेट परिणाम आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीवर झाला आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (डीजीसीए) आकडेवारीतून हा कल स्पष्ट झाला असून पर्यटन व्यावसायिकांच्या मते मे महिन्यातही हीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.
आकडेवारीनुसार, २०२५च्या मार्च महिन्यात भारतातून १८ हजार ५०२ आंतरराष्ट्रीय विमानोड्डाणे झाली होती. यावर्षी मार्चमध्ये हा आकडा ११ हजार २८४ वर आला. एप्रिल २०२५मध्ये १८ हजार ३२३ आंतरराष्ट्रीय उड्डाणे झाली होती, तर यंदा एप्रिलमध्ये ती केवळ ११ हजार ५०८ इतकी राहिली. म्हणजेच एप्रिलमध्ये या संख्येत सुमारे ३७ टक्क्यांची घट झाली आहे.
प्रवासीसंख्येतही याच काळात मोठी घसरण दिसून आली. मार्च २०२५मध्ये २९ लाखांहून अधिक प्रवाशांनी आंतरराष्ट्रीय प्रवास केला होता. त्याच्या तुलनेत यंदाच्या मार्चमध्ये हा आकडा १८ लाख ४४ हजार ९७६ इतका राहिला. एप्रिल २०२५मध्ये ३० लाखांहून अधिक प्रवासी परदेशात गेले होते, तर यंदा एप्रिलमध्ये केवळ १८ लाख २४ हजार ९३६ प्रवाशांनी आंतरराष्ट्रीय प्रवास केला. यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत ११ लाख ८२ हजारांहून अधिक प्रवासी कमी झाले. यंदाच्या जानेवारीत ३३ लाखांहून अधिक आणि फेब्रुवारीत २८ लाखांहून अधिक प्रवाशांनी परदेश प्रवास केला होता.
पर्यटन क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, परदेशपर्यटन ही गरज नसून आनंदाचा भाग असते. त्यामुळे आनंदासाठी पर्यटनाचा विचार केलेल्या अनेकांनी यंदा प्रवास पुढे ढकलला किंवा रद्द केला.
देशांतर्गत प्रवासातही मर्यादित घट
आंतरराष्ट्रीय पर्यटनात घट झाल्याने हे प्रवासी देशांतर्गत पर्यटनाकडे वळतील, असा अंदाज होता. मात्र देशांतर्गत हवाई वाहतुकीच्या आकडेवारीत त्याचे ठोस प्रतिबिंब दिसत नाही. देशांतर्गत प्रवासीसंख्येत दोन महिन्यांमध्ये काहीशी घट झाली असली, तरी ती आंतरराष्ट्रीय वाहतुकीइतकी तीव्र नाही. गेल्या वर्षी मार्च आणि एप्रिल महिन्यांत अनुक्रमे १ कोटी ४५ लाख आणि १ कोटी ४३ लाख प्रवाशांनी देशांतर्गत हवाई प्रवास केला होता. यंदा मार्चमध्ये हा आकडा १ कोटी ४३ लाख, तर एप्रिलमध्ये १ कोटी ३८ लाख इतका राहिला.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा